नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा निकटवर्तीय अमित कात्याल याच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्ली-एनसीआरमधील विविध परिसरांत कारवाई केल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली.
कथित ‘नोकरीच्या बदल्यात रेल्वेची जमीन’ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कात्याल यांना गतवर्षी अटक केली होती. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगी आणि खासदार मीसा भारती आणि इतर काही जणावंर आरोप आहेत.
सूत्रांनी सांगितले की, दिल्ली, गुरुग्राम आणि सोनीपतमधील ‘कृष्णा बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड’च्या एकूण 27 ठिकाणी ईडीच्या अधिका–यांनी छापे टाकले. या कंपनीचे प्रवर्तक अमित कात्याल आणि राजेश कात्याल आहेत. ही कंपनी हरियाणातून चालते.
ईडीचा तपास प्रवर्तकांकडून घर खरेदीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या निधीचा कथित गैरव्यवहार आणि ते परदेशात खर्च करण्याशी संबंधित आहे. अमित कात्यालने घर खरेदीदारांचे २०० कोटींहून अधिक पैसे श्रीलंकेला पाठवल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा कृष्णा कात्याल याने त्याचा पासपोर्ट अधिकाऱ्यांना सुपूर्द केला आहे.