निश्चित उद्दिष्ट असलेला विरोधी पक्ष हवा
नवी दिल्ली, दि. 13 – निश्चित कार्यक्रमावर आधारलेल्या विरोधी पक्षांचे मी स्वागत करीन, असे पंतप्रधान इंदिरा गांधींनी लंडनमधील दोन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना मुलाखत देताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, विरोधी पक्षाजवळ काही मूल्ये व कार्यक्रम हवा. त्यांना काही उद्दिष्ट वा ध्येय असावे. परंतु त्यांनी घटनाबाह्य मार्ग चोखाळू नयेत. कॉंग्रेसची सत्ता अपरिहार्य आहे असे मी मानीत नाही. माझ्यावाचूनही देशाचे काही अडणार नाही. परंतु आम्हाला आमची जबाबदारी टाळता येणार नाही. विरोधी पक्षांनी शिस्त पाळलेली नाही.
“ओव्हरटाइम’ पद्धत आर्थिक दृष्टीने घातक
मुंबई – सध्याच्या “ओव्हरटाइम’चे पैसे देण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रीय क्षेत्रांतील कारखान्यांचे नुकसान होते, अशी तक्रार केंद्रीय अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांजवळ केली. त्यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ असे उदाहरण दिले की, एका सरकारी कारखान्यात तृतीय श्रेणीच्या कामगाराचे ओव्हरटाइमचे पैसे म्हणून 2948 रु. मिळाले व चतुर्थ श्रेणी कामगाराला 2588 रु. मिळाले. वास्तविक त्या दोघांना अनुक्रमे दरमहा 4720 रु. व 3868 रुपये पगार मिळतो. मात्र तरीही कामगारांकडून अधिकचे काम करून घेतल्यास त्यांना मोबदला मिळावा.