T20 World Cup History | टी-20 विश्वचषकात धावा करण्याच्या बाबतीत आशियाई खेळाडू पुढे! किंग कोहली आहे पहिल्या क्रमांकावर…

Highest run-scorers at T20 World Cup : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपची 9वी आवृत्ती सुरू होत आहे. यावेळी या स्पर्धेत 20 संघ सहभागी होत आहेत. ज्यांची पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. T20 विश्वचषकात अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले. असाच एक विक्रम आहे ज्यामध्ये आशियाई खेळाडूंचा पूर्ण दबदबा आहे. तो विक्रम म्हणजे टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा होय.
किंग कोहली आघाडीवर…
साल 2007 मध्ये सुरू झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आशियाई खेळाडूंनी अव्वल 5 मध्ये वर्चस्व राखले आहे. आठ वेळा झालेल्या या स्पर्धेत विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीतील पहिल्या पाचमध्ये ख्रिस गेल हा एकमेव खेळाडू आहे जो आशियाई नाही.
विराट कोहली : टी-20 विश्वचषक 2024 पूर्वी विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात 27 सामने खेळले आहेत. या 27 सामन्यांमध्ये त्याला 25 डावात फलंदाजीची संधी मिळाली. 25 डावांमध्ये कोहलीने 131.30 च्या स्ट्राईक रेटने 1141 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. T20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीपर्यंत विराट कोहलीने 103 चौकार आणि 28 षटकार मारले आहेत.
महेला जयवर्धने : महेला जयवर्धने याने शेवटचा टी-20 विश्वचषक 2014 साली खेळला होता. टी-20 विश्वचषकात त्याने 31 सामने खेळले आहेत. या 31 सामन्यांमध्ये जयवर्धनेने 134.74 च्या स्ट्राईक रेटने 1016 धावा केल्या आहेत. त्याने टी-20 विश्वचषकात 6 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. जयवर्धनेने या स्पर्धेत 111 चौकार आणि 25 षटकार मारले आहेत.
ख्रिस गेल : ख्रिस गेल शेवटचा टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळला होता. टी-20 विश्वचषकात त्याने 33 सामन्यांपैकी 31 डाव खेळले आहेत. या 31 डावांमध्ये गेलने 142.75 च्या स्ट्राईक रेटने 965 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 7 अर्धशतके आणि 2 शतकांचा समावेश आहे. ख्रिस गेलने T20 वर्ल्ड कपमध्ये 78 चौकार आणि 63 षटकार मारले आहेत.
T20 World Cup 2024 : श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव, सराव सामन्यातच ठरले उलटफेरचे बळी…
रोहित शर्मा : रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळले आहेत. रोहितने 39 सामन्यांमध्ये 36 डाव खेळले आहेत. या 36 डावांमध्ये त्याने 127.88 च्या स्ट्राईक रेटने 963 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 अर्धशतकांचाही समावेश आहे. या स्पर्धेत आतापर्यंत रोहित शर्माने 91 चौकार आणि 35 षटकार मारले आहेत.
तिलकरत्ने दिलशान : तिलकरत्ने दिलशान शेवटचा टी-20 विश्वचषक 2016 मध्ये खेळला होता. दिलशानने 35 टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये 34 डाव खेळले आहेत. या 34 डावांमध्ये त्याने 124.06 च्या स्ट्राईक रेटने 987 धावा केल्या आहेत. त्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तिलकरत्ने दिलशानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 101 चौकार आणि 20 षटकार मारले आहेत.





