नवी दिल्ली – यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या ३२४ खासदारांच्या संपत्तीचे पृथक्करण करण्यात आले. त्यानुसार, त्या खासदारांच्या संपत्तीत मागील ५ वर्षांत सरासरी ४३ टक्के इतकी वाढ झाली आहे. संबंधित खासदारांची २०१९ या वर्षात सरासरी संपत्ती २१ कोटी ५५ लाख रूपये इतकी होती.
आता त्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन ती ३० कोटी ८८ लाख रूपये इतकी झाली आहे. म्हणजेच, त्या खासदारांच्या संपत्तीमध्ये ५ वर्षांत सरासरी ९.३३ कोटी रूपयांची वाढ नोंदली गेली आहे. संबंधित पृथक्करण असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केले आहे.
भाजपच्या तिकिटांवर पुन्हा निवडणूक लढवत असलेल्या १८३ खासदारांची सरासरी संपत्ती १८.४० कोटींवरून वाढून २५.६१ कोटी रूपयांवर पोहचली आहे. ती वाढ ३९.१८ टक्के नोंदली गेली आहे. संपत्ती वाढीच्या आघाडीवर कॉंग्रेस खासदारांनी भाजपच्या खासदारांना मागे टाकले आहे. कॉंग्रेसच्या ३६ खासदारांची सरासरी संपत्ती ४४.१३ कोटींवरून ६५.६४ कोटी रूपयांवर गेली आहे. ती वाढ ४८.७६ टक्के इतकी आहे.
प्रमुख राजकीय पक्षांचा विचार करता धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) एका खासदाराची संपत्ती तब्बल ३१७ टक्क्यांनी वाढली आहे. ती ९ कोटींवरून ४० कोटी रूपयांवर गेली आहे. बिजू जनता दलाच्या (बिजद) खासदारांची सरासरी संपत्ती २.४१ कोटी रूपयांवरून ६.८५ कोटी रूपये नोंदली गेली आहे. ती वाढ १८४ टक्के आहे.
तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांच्या संपत्तीमध्ये १४३ टक्क्यांची भर पडली आहे. ती सुमारे १९ कोटींवरून ४६ कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे. वायएसआर कॉंग्रेसच्या खासदारांची संपत्ती ८४ कोटींनी वाढली. ती २८ कोटींवरून ५२ कोटी रूपयांवर गेली. तृणमूल कॉंग्रेसच्या १६ खासदारांच्या संपत्तीमध्ये सुमारे ५४ टक्क्यांची भर पडली. ती १५.६९ कोटींवरून २४ कोटींवर पोहचली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ८ खासदारांची सरासरी संपत्ती ४८.१३ टक्क्यांनी वाढली. ती १९.७७ कोटी रूपयांवरून २९.२८ कोटी रूपये इतकी झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत ६८ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. ती ७ कोटींवरून ११.८० कोटी रूपयांवर पोहचली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या एकमेव खासदाराची संपत्ती १२ कोटींवरून १४ कोटी रूपयांवर पोहचली. ती वाढ १४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ३ खासदारांची सरासरी संपत्ती २१.०५ टक्क्यांनी वाढली. ती ४८ कोटींवरून ५८ कोटी रूपये इतकी झाली.