मुंबई – पुणे पोर्शे कार अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण? हे तपासावे लागेल. विशेषतः या प्रकरणी त्यांचेच कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची व नार्को टेस्ट करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
पुण्याच्या भीषण अपघातात 2 तरुणांचा बळी गेला. एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्याच्या मागे कोण आहे? अशी शंका माझ्या मनात होती. पण आता अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केल्याची बातमी आली आहे. प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार या प्रकरणात पहिल्या 4 दिवसांत काहीही बोलले नाही.
मी सकाळी उठून काम करतो म्हणणाऱ्या दादांनी या प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव येत होते. पण ही सारवासारव कुणासाठी चालली होती? या प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या होत्या.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, डोंबिवली एमआयडीसी स्फोट, उजनीतील बोट दुर्घटना आदी विविध घटना गत काही दिवसांत घडल्या. अंजली दमानिया या घटनांवर संवेदनशील दिसल्या नाही. त्यांना नागरीक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण काही लोकांनी पुण्याच्या घटनेवरून राष्ट्रवादीला व आमच्या नेत्यांना नाहक बदनाम करण्याचा उद्योग सुपारी घेऊन चालवला आहे, असे राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
दमानियांकडे काय पुरावे आहेत?
उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करणे गैर आहे. दमानिया यांच्याकडे काय पुरावे आहेत?, पालकमंत्री म्हणून पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना फोन करणे, स्थितीचा आढावा घेणे हे त्यांचे काम असते. आता यापुढे अंजली दमानियांना विचारून फोन करायचा का? काम करणारा माणूस सातत्याने काम करत असतो, असे ते म्हणाले.