अबाऊट टर्न : भाकीत

-हिमांशू

किती छान असतं ना कटकटीचे विषय गुंडाळून दूर कोपऱ्यात भिरकावून देणं! करोनासारखा विषय तर अजिबात जवळ येऊ देता कामा नये. एकवेळ विषाणू जवळ आला तरी चालेल! कुणालाच काही समजलेलं नाही; पण दावे मात्र सगळेच करतायत, अशा विषयावर चर्चा करून काय उपयोग? बाकी लॉकडाऊन, अर्थव्यवस्था, जीडीपी, रोजगार, बाजारपेठ वगैरे सगळे विषय बरेच उगाळून झालेत. त्यामुळे आज आम्हीही ठरवलंय, अजिबात त्रास करून घ्यायचा नाही आणि कुणाला होऊ द्यायचा नाही. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडण्यासाठी प्रथम एक कोडं घालतोः “भारतातील सर्वाधिक गोंडस बाळाचं नाव सांगा..!’ 

परवा एका मित्राला हाच प्रश्‍न विचारून आम्ही मस्तपैकी न्यूज चॅनेल बघत बसलो. मित्राला उत्तर सापडलं नाही; पण आम्हाला विषयांतराचे फायदे सापडले. सुमारे तीन-चार चॅनेल आम्ही पाहिली असतील; परंतु सर्वच चॅनेलवर तिसऱ्या महायुद्धाची जोरदार तयारी सुरू झालेली होती. एका चॅनेलने महायुद्ध सुरू होण्याची तारीखसुद्धा सांगितली. वास्तविक, याच चॅनेलवरून पूर्वीही एकदा अशीच तारीख जाहीर करण्यात आली होती. परंतु प्रस्तुत तारखेला कोणत्याही देशानं महायुद्ध सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मग आमच्या लक्षात आलं की, 2012 साली जगबुडीची तारीख जशी दिली होती, तशीच ही तारीख आहे. तारीख महत्त्वाची नसतेच कधी… महत्त्वाचं असतं विषयांतर!

तर, आमच्या कोड्याचं उत्तर एव्हाना कुणाला सापडलेलं नसणार याची खात्री आहे. उत्तर येणेप्रमाणे- भारतातील सर्वांत गोंडस बाळाचं नाव तैमूर अली खान असं आहे. आता तुम्ही म्हणाल, “आम्ही हेच उत्तर सांगणार होतो.’ पण मग आम्ही विचारू, “तैमूर मोठेपणी कोण होणार, हे सांगा.’ खरं तर या प्रश्‍नाचं उत्तर सगळ्यात सोपं आहे; कारण ते त्याच्या तीर्थरूपांनी म्हणजे अभिनेता सैफ अली खानने ऑलरेडी दिलेलं आहे. सैफच्या मते, तैमूर आतापासूनच सगळ्यांना “एन्टरटेन’ करतो, सबब तो अभिनेताच बनणार! खरं तर सैफने सांगायच्या आधीपासूनच आपल्याला हे ठाऊक आहे.

जन्मापासून एवढं प्रमोशन कुणाचं झालंय कधी? त्याच्या नावानं खेळणीसुद्धा बनवलीत काही कंपन्यांनी! असो, सैफने एका पॉडकास्टमधून अशी भविष्यवाणी केली, जी सर्वांना ठाऊक आहे. परंतु तैमूर मोठेपणी खरोखर अभिनेता बनला, तर तो एक वेगळाच विक्रम असेल, असं आम्हाला वाटतं. सामान्यतः अभिनेता बनायचं असेल तर संबंधित व्यक्‍तीने त्यासाठी तयारी करणं अपेक्षित असतं. आवाज, संवादफेक, मुद्रा, कायिक अभिनय वगैरे! कथित नेपोटिजम वगैरे गोष्टींवर आम्हाला कोणतंही भाष्य करायचं नाहीये. परंतु जमाना “प्रमोशन’चा आहे, हे तरी सर्वांना मान्य असावं.

सैफच्या संबंधित पॉडकास्ट मुलाखतीची बातमी वाचताना काही गोष्टी स्पष्ट होत गेल्या. डोळ्यासमोर असं चित्र दिसू लागलं, की तैमूर हा “जन्मजात अभिनेता’ आहेच. त्यासाठी त्याने काही विशेष तयारी करण्याची गरज बहुधा पडणार नाही. तयारी आपण म्हणजे प्रेक्षकांनी करायची आहे. आतापासूनच आपण सातत्यानं स्वतःला रोज बजावायचं आहे की, “वंडर किड’ म्हणून गाजलेला तैमूर काही वर्षांनी जेव्हा रूपेरी पडद्यावर येईल, तेव्हा त्याला “सुपरहिट’ करणं, ही आपली नैतिक जबाबदारी!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.