65 वर्षांपूर्वी प्रभात : पुण्यांतील सर्व शाळा-कॉलेज, दुकाने आणि कारखाने बंद

ता. 23, माहे नोव्हेंबर, सन 1955

पुण्यातील 30 हजार लोकांच्या विराटसभेत मुरारजींच्या राजीनाम्याची मागणी 

पुणे, ता. 22 – “मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्र’ या मागणीसाठी गेल्या शुक्रवारी व काल मुंबई येथे नागरिकांनी केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांवर, पोलिसांनी लाठीहल्ले, अश्रुधूर, गोळीबार इत्यादी मार्गांनी जे अनन्वित अत्याचार केले त्यांचा तीव्र निषेध करणारा ठराव आज सायंकाळी शनिवार वाड्यासमोर भरलेल्या नागरिकांच्या प्रचंड सभेत करण्यात आला.

पुण्याचे माजी मेयर श्री. गणपतराव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या सर्वपक्षीय सभेला अंदाजे 30 हजार नागरिक उपस्थित होते. काल मुंबईत झालेल्या गोळीबारात बळी पडलेल्या 11 हुतात्म्यांना या सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात अभिवादन करण्यात आले असून, महाराष्ट्रीय जनता मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्राची मागणी सरकारच्या अडथळ्यास व दडपशाहीस न जुमानता, आपल्या एकजुटीच्या जोरावर लवकरच पूर्ण करून घेईल अशी प्रतिज्ञा या ठरावरूपाने करण्यात आली.

या ठरावाला पाठिंबा देणारी अशी या सभेत जयंतराव टिळक, रतनलाल भंडारी, केशवराव जेधे, नारायणराव गोडबोले, वि. द. चितळे, बा. न. राजहंस, व आचार्य केळकर यांची भाषणे झाली. केशवराव जेधे म्हणाले की, मुंबईत झालेल्या प्रकारांना स. का. पाटील, मोरारजी यांची प्रक्षोभक भाषणेच जबाबदार आहेत. वि. द. चितळे यांनीही राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला व संयुक्‍त महाराष्ट्राची मागणी मान्य झाली नाही तर त्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रहाचा लढा उभारावा लागेल अशी घोषणा केली.

पुण्यांतील सर्व शाळा-कॉलेज, दुकाने आणि कारखाने बंद 

पुणे – मुंबापुरीतील अकरा निदर्शकांचा बळी घेणाऱ्या कालच्या गोळीबाराच्या निषेधार्थ आज पुण्यात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज आज सकाळपासून ओस पडली आहेत. शहरांतील बाजारपेठा बंद असून शहराच्या सर्व भागांतील बहुतेक दुकानेही बंद आहेत.

खडकी, देहुरोड येथील संरक्षण खात्याच्या डेपोमधील बहुसंख्य कामगारही हरताळात सामिल झाले असून शहरातील इतर कारखाने व राजा बहादूर मिल्स ही एकमेव कापड गिरणीही आज बंद आहे. तरी शहरात सर्वत्र शांततेचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.