-सत्यजित दुर्वेकर
काही देशांमध्ये “स्टेम सेल थेरपी’द्वारेही करोना रुग्णांना बरे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) तर या उपचार पद्धतीद्वारे 73 करोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याची सुखद बातमीही आली आहे.
करोना संसर्गाचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने जगभरातील देश लस शोधण्यात व्यग्र आहेत. भारतसुद्धा या बाबतीत गतिमान प्रयत्न करीत आहे. परंतु चाचणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून लस सामान्य लोकांना उपलब्ध होण्यास अद्याप बराच कालावधी जावा लागणार आहे. अनेक देशांमध्ये करोनावर उपचार करण्यासाठी संभाव्य औषधे आणि उपचार पद्धतींच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यातील काही औषधे आणि उपचार पद्धतींना प्राथमिक टप्प्यात यशही येताना दिसत आहे. काही देशांमध्ये “स्टेम सेल थेरपी’द्वारेही करोना रुग्णांना बरे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) तर या उपचार पद्धतीद्वारे 73 करोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याची सुखद बातमीही आली आहे. तेथील परराष्ट्र मंत्रालयाच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अबूधाबी स्टेम सेल सेंटरने (एडीएससीसी) स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून करोनाच्या सर्व 73 रुग्णांना बरे करण्यात यश मिळविले आहे. या सेंटरने स्टेम सेलच्या माध्यमातून करोनाबाधितांवर उपचार करण्याचे “गेम चेंजर’ हे नवे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यामुळे करोनावर विजय संपादन करणे शक्य होणार आहे.
या नव्या उपचारपद्धतीत रुग्णाच्या रक्तातून स्टेम सेल्स काढून त्या पुन्हा सक्रिय करून रुग्णाच्या फुफ्फुसात सोडण्यात येतात. त्यामुळे फुफ्फुसाच्या पेशी पुनरुज्जीवित करण्यात यश येते आणि अंतिमतः फुफ्फुसाची क्षमता पुन्हा वाढते. यूएईचे परराष्ट्र मंत्री हिंद अल ओतैबा यांच्या म्हणण्यानुसार, करोनाच्या विषाणूशी सुरू असलेल्या जागतिक लढाईत हा एक अभूतपूर्व टप्पा ठरू शकतो. या पद्धतीने उपचार केलेल्या एकाही रुग्णाने कोणत्याही साइड इफेक्ट्सची तक्रार केली नाही.
काही भारतीय संशोधकही स्टेम सेल थेरपीने करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. अनेक भारतीय डॉक्टरांना असे वाटते की, शरीरात आढळणाऱ्या मिंजेकाइमल स्टेम सेल्स करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या खराब झालेल्या अवयवांची अवस्था पूर्ववत करू शकतात. कारण खराब झालेल्या ऊती पूर्ववत करणे हेच स्टेम सेल्सचे काम असते. स्टेम सेल्स विषयातील भारतीय तज्ज्ञांच्या मते, रुग्णाच्या किंवा एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरातून स्टेम सेल्स काढून प्रयोगशाळेत त्या “कल्चर’ करून करोनाबाधित व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तरी त्याचा लाभ होऊ शकेल.
ग्रेटर नोएडा येथील दोन डॉक्टरांसह देशातील आठ डॉक्टरांच्या “भारतीय स्टेम सेल स्टडी ग्रुप’ या गटाने स्टेम सेल्स थेरपीवर संशोधन केल्यानंतर असा दावा केला आहे की, करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण स्वतःच्याच स्टेम सेल्सच्या आधारे बरे होऊ शकतील. त्यांच्या म्हणण्यानुसार प्लासेन्टा, अंबीलिकल कॉर्ड आणि बोन मॅरो येथून काढण्यात आलेल्या स्टेम सेल्सच्या माध्यमातून करोनाग्रस्तावर यशस्वी उपचार करता येणे शक्य आहे. स्टेम सेल्स तीन प्रकारच्या असतात- भ्रूण स्टेम सेल (एम्ब्रियोनिक स्टेम सेल), वयस्क स्टेम सेल (ऍडल्ट स्टेम सेल) आणि कॉर्ड स्टेम सेल.
संशोधक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चीन आणि इस्राएलमध्ये झालेल्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, प्लासेन्टा (गर्भावस्थेत मूल ज्या ऊतींच्या थरात असते), तसेच अम्बीलिकल कॉर्ड (गर्भाची नळी) या भागातून स्टेम सेल काढून करोनाच्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, करोनाग्रस्त रुग्णाच्या स्टेम सेल्सला करोनाचा विषाणू बाधित करू शकत नाही. त्यामुळे स्टेम सेल्स अशा रुग्णाच्या रक्तात पोहोचून आपल्यासारख्याच अनेक पेशी प्रचंड वेगाने तयार करून रुग्णाला बरे करू शकतात. चीनमध्येही काही संशोधकांनी करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरात मिंजेकाइमल स्टेम सेल्स सोडून त्यावर अभ्यास केला आहे. या अभ्यासादरम्यान संधोधकांना असे आढळले की, करोना संसर्गामुळे ज्या रुग्णांना न्यूमोनिया झाला होता, ते रुग्ण स्टेम सेल्स थेरपीनंतर बरे होऊ लागले.
चीनमधील वुहान शहरातील स्टेम सेल्स थेरपी तज्ज्ञ डॉ. डॉंगचेंग वू यांनीही स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून करोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचा दावा केला आहे. आधुनिक चिकित्साविज्ञानाने जी स्टेम सेल थेरपी शोधून काढली आहे, ती एक अशी उपचारपद्धती आहे, ज्या माध्यमातून असाध्य मानल्या जाणाऱ्या अनेक आजारांवर यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे. स्टेम सेल्स या शरीरातील आश्चर्यजनक पेशी मानल्या जातात. या पेशींमध्ये ऊतींच्या पुनरुज्जीवनाची आणि पुनर्निर्माणाची विलक्षण क्षमता असते. कारण या विशिष्ट प्रकारच्या पेशी असून, त्यांच्यामध्ये स्वतःचे पुनर्निर्माण करण्याची क्षमता असते. स्टेम सेल थेरपीमध्ये स्टेम पेशीचा उपयोग केला जातो आणि या पेशी विविध कोशिकांमध्ये फरक करण्यात सक्षम असतात. ही थेरपी नवीन स्टेम सेलची निर्मिती करण्याबरोबरच बाधित ऊती बदलून टाकण्यावर लक्ष केंद्रित करते. शरीरातील रोगग्रस्त किंवा क्षतिग्रस्त पेशींची जागा घेऊन स्टेम पेशी त्यांच्यात नवजीवन निर्माण करतात.
स्टेम सेल थेरपी ही एक अशी उपचारपद्धती आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या स्टेम सेलचा वापर करून विभिन्न प्रकारचे आजार बरे करू शकते. या थेरपीत मुख्यत्वे सुदृढ आणि अनिर्दिष्ट स्टेम सेलच्या सोबत क्षतिग्रस्त ऊती बदलण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. ही थेरपी ल्यूकेमिया, टिश्यू ग्राफ्ट्स, कर्करोग, स्पाइनल कॉर्डला झालेली दुखापत, सेरेब्रल पॉल्सी, पार्किन्सन्सचा आजार, मल्टिपल स्कलेरोसिस, व्हिज्युअल इम्पेयरमेन्ट म्हणजे डोळ्यांचे आजार, मेंदूला झालेली दुखापत, मधुमेह, नर्वज् सिस्टिम डिसऑर्डर म्हणजे मज्जासंस्थेशी संबंधित आजार, हृदयविकार जडलेले रुग्ण, अर्धांगवायू, हेपेटायटिस, डीएनएवर झालेले दुष्परिणाम यासह अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते आणि अत्यंत आशादायक मानली जाते. करोनाग्रस्तांवर उपचार करण्याच्या बाबतीत जसजसे प्रयोग केले जातील, तसतशी ही उपचारपद्धती संजीवनी म्हणून समोर येईल, अशी खात्री संशोधक व्यक्त करतात.