65 वर्षांपूर्वी प्रभात : जरूर तेथे कायदेभंग करा

ता. 28, माहे नोव्हेंबर, सन 1955

भारतीय मालाची प्रचंड बाजारपेठ सौदी अरेबिया 

सौदी अरेबियाचे राजे इब्न सौद ता. 26 रोजी भारतात दौऱ्यासाठी आले आहेत. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने सौदी अरेबियासंबंधीची माहिती येथे दिली आहे. सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ अदमासे 10 लक्ष मैलांचे आहे, त्या देशाच्या उत्तरेस इराक आणि सीरिया, दक्षिणेस येमन, हरमाउट आणि ओमान हे देश असून पूर्वेकडे इराणचे आखात आणि पश्‍चिमेस तांबडा समुद्र आहे.

ह्या राष्ट्राची लोकसंख्या 70 लक्षाच्या आसपास आहे. मक्‍का शहर ही त्या देशाची राजधानी असून रियाध, मदिना, जेद्दा आणि हुफुत ही इतर महत्त्वाची शहरे या राज्यात आहेत. इराणच्या आखाताजवळील किनाऱ्यातल्या तेलाच्या संपन्न क्षेत्रामुळे येणारे उत्पन्न दरदिवशी 9,53,000 बॅरेल झाले. त्याचे मुख्य ठिकाण धाहरान हे असून अवकाइर्के येथील तेल विभाग मोठा आहे. 1954 मध्ये ह्या तेल विहरींमुळे सुमारे 22,000 लोकांना रोजगार मिळाला. त्यात भारतीय सुदानी इटालियन, पाकिस्तानी, अमेरिकन इत्यादींचा अंतर्भाव आहे.

सौदी अरेबियातील तेल विहिरी संपन्नतेच्या दृष्टीने जगात प्रसिद्ध असून येथील तेल विहिरीतील उत्पादनाचे प्रमाण प्रचंड असते. सौदी अरेबियाचे जगात बहुतेक सर्व देशांशी व्यापारीदृष्ट्या संबंध आहेत. भारतातून तांदूळ, आटा, डाळी, साखर, चहा, कॉफी, सुकी फळे, मसाल्याचे पदार्थ, तयार कपडे, फर्निचर, इमारती लाकूड, रेशमी वस्तू इत्यादी वस्तू ह्या देशात आपण निर्यात करतो. भारतातून ह्या देशात दरवर्षी 4,40,16,055 सौदी रिआल्स किमतीचा (सौदी रिआल म्हणजे अंदाजे 1.5 रुपया) माल निर्यात होतो. उलट या देशाकडून भारताकडे प्रतिवर्षी 12,000 सौदी रिआल्स किमतीचा माल निर्माण होतो.

जरूर तेथे कायदेभंग करा

हैदराबाद – अन्यायाच्या परिमार्जनार्थ आवश्‍यक तेथे असहकाराची चळवळ सुरू करण्याचा आदेश, डॉ. राम मनोहर लोहियांनी आपल्या अनुयायांना दिला आहे.

सत्ता हाती घेणे हे आपल्या नवजात पक्षाचे ध्येय असून संधीसाधूपणाने संमिश्र सरकारात घुसून ती मिळवावी असे आम्हास वाटत नाही. देशात समाजवादी समाजरचना आणण्यासाठी उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण व जमिनीचे फेरवाटप झाले पाहिजे. यासाठी जरूर तेथे सविनय कायदेभंगाचे हत्यार उपसावे, असा डॉ. लोहियांचा आदेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.