विविधा : सेनापती बापट

-माधव विद्वांस

स्वातंत्र्य सेनानी अर्थात सेनापती बापट यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केल्यामुळे त्यांना जनतेने “सेनापती’ ही उपाधी दिली. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर येथे 12 नोव्हेंबर 1880 रोजी झाला. पारनेरहून चार किलोमीटर पारनेर-अळकुटी रस्त्यावर पश्‍चिमेला डोंगर कपारीत त्यांचे आराध्य दैवत मंगळाचा गणपती मंदिर आहे. म्हणून या ठिकाणाला “गणेश खिंड’ असे संबोधतात.

या मंदिराच्या कळसाखाली असलेल्या खोलीत सेनापती बापट व्यायाम करीत. स्वातंत्र्यपूर्व काळात सेनापती बापट अनेक लढायांत भाग घेत.त्यावेळी इंग्रज त्यांना पकडण्यासाठी पारनेर परिसरात येत असत. मात्र बापटांना याबाबत सुगावा लागताच ते या व्यायामशाळेचा आश्रय घेऊन इंग्रजांना चकवा देत. त्यांचे पारनेरमधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.

स्वातंत्र्य लढ्यानिमित्त त्यांना अनेक वेळा पारनेर बाहेर राहावे लागत होते, तरीसुद्धा त्यांनी गणेशावरील आपली श्रद्धा कमी होऊ दिली नाही.स्वातंत्र्याच्या लढ्यात कोणतीही कृती करताना सेनापती बापट या गणेशाला ते “श्रीहरी’ म्हणत. ते “श्रीहरीची इच्छा असेल तसेच घडेल’ असे म्हणत. यावरून त्यांची या गणेशावरील श्रद्धा किती अढळ होती हे दिसून येते.

त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची “जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती’ मिळाली. बी.ए.पर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले. डेक्‍कन कॉलेजमध्ये सशस्त्र क्रांतीद्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली होती. वर्ष 1903 मधे बी.ए.परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले व एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

श्‍यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेल्या “इंडिया असोसिएशन’ या क्रांतिकारक संस्थेत ते सामील झाले. पॅरिस येथे जाऊन त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून बॉंम्ब बनविण्याचे शिक्षण घेतले. भारतात येताना त्यांनी अनेक शस्त्रे आणली. कलकत्ता येथे अनेक क्रांतिकारकांना त्यांनी ही विद्या शिकवली. परदेशातून आल्यावर त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्र दैनिक मराठातही नोकरी केली तसेच डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशातही त्यांनी काम केले. गोवा मुक्‍ती लढ्यातही त्यांनी भाग घेतला. 1913 ते 22 या दशकात त्यांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले.

वर्ष 1921 ते 23 या दरम्यान त्यांना मुळशी आंदोलनात तीनदा कारागृहवासाची शिक्षा झाली. त्यांच्यावर सावरकर, लो. टिळक, योगी अरविंद तसेच महात्मा गांधीजींचाही प्रभाव होता. योगी अरविंदांचा “दिव्यजीवन’ हा ग्रंथ त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केला आहे. त्यांनी हरिजनांच्या मंदिरप्रवेशास पाठिंबा दिला होता.

स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्‍ती आंदोलन, संयुक्‍त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या बंगल्यासमोर त्यांनी सीमाप्रश्‍नावर उपोषण केले होते. 15 ऑगस्ट, 1947 रोजी पुण्यातील ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 28 नोव्हेंबर, 1967 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. अभिवादन.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.