दमणमधील नीग्रो व युरोपीय सैनिकांत “लढाई’
मुंबई, ता. 13 – दमणमध्ये असलेल्या नीग्रो आणि युरोपीय सैनिकांत चकमक उडून चौघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. नीग्रो तुकडीच्या कप्तानाने आपल्याच तुकडीतील एका दारू प्यालेल्या सैनिकास बेशुद्ध पडेपर्यंत मारले. इतर नीग्रो सैनिकांनी या गोष्टीबद्दल नापसंती दर्शविली; कारण सदर सैनिकाने कामावर नसताना मदिरापान केले होते. सैनिकाला मारले हे चूक झाले असे वाटून सैनिकांनी कप्तानास घेरले.
तेव्हा कप्तानाबरोबर असलेल्या चौघा सैनिकांनी इतरांवर हल्ला केला. या प्रकारामुळे युरोपीय सैनिकांत घबराट सुरू झाली. त्यांनी आपल्या बंदुका व रिव्हाल्व्हरमधून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. नीग्रो आपल्या भोजनस्थानाच्या भिंतीमागे जाऊन दडले व त्यांनी दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर तासभर चाललेली ही “लढाई’ संपली.
माकड बसवून अग्निअस्त्र सोडले
केप कनव्हेरल – आज अमेरिकन लष्कराने अस्त्राच्या शेवटच्या अग्रांत एक माकड बसवून सोडले. अमेरिका प्रथमच प्राणी बसवून असले अस्त्र सोडीत आहे. हे अस्त्र आकाशात सोडण्यात यश मिळाल्याचे लष्करातर्फे प्रकट करण्यात आले आहे.
हे अस्त्र 600 मैल उंच जाईल व त्यातील माकड समुद्रातून जिवंत परत मिळवता येईल असे वाटते. जीव-औषधी विज्ञानातील तज्ज्ञमंडळी जिवंत हाती आलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी अगदी सज्ज आहे.
राष्ट्रपतींची जिवंत ज्वालामुखीस भेट
बांडुंग – भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी काल येथून 25 मैलावरच्या जिवंत ज्वालामुखीस भेट दिली. ज्वालामुखीच्या प्रभावाची पाहणी करता यावी म्हणून एक उंच व्यासपीठ उभारण्यात आले होते. राष्ट्रपतींनी त्यावर उभे राहून जमिनीच्या पृष्ठभागी पडलेल्या भेगा पाहिल्या. हा भाग पर्वतश्रेणीनी वेढला असून, ज्वालामुखी पर्वताचा परिघ अर्धा मैल आहे.
खोली 400 फूट आहे. जमिनीचा रंग राखी झाला आहे व बाजूला हिरवे-पिवळे असे गंधक आहे. तेथे जाणाऱ्यास गंधकाचा लगेच वास येतो. तेथे एक छोटे डबके दिसले. त्यात दिसणाऱ्या करड्या रंगाचे द्रव म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस होय, असे डॉ. प्रसादांना सांगण्यात आले.