अमेरिकेने चंद्रावर अग्निबाण सोडला
केपकॅनाव्हराल (फ्लोरिडा), ता. 6 – जूनो न. 2 या नावाचा आपला दुसरा अग्निबाण अमेरिकेने आज 11.15 वा. (हिंदी वेळ) चंद्रावर सोडला. हा अग्निबाण अंतराळात सोडल्यानंतर त्याच्यावरून रेडिओ संदेश मिळाला असे लष्करी संशोधन शाळेतर्फे सांगण्यात आले आणि त्याचा प्रवास निर्वेध चालू झाल्याची ग्वाही देण्यात आली.
या चंद्रवेधी अग्निबाणाने चार टप्पे यशस्वीरीत्या ओलांडले असे दुपारी 12.35 वाजता जाहीर करण्यात आले. या अग्निबाणाचे नाकाडांत एक तेरा पौंड वजनाचा काचेचा त्रिशंकू असून चंद्रप्रदेशाचे परिसरात तो 34 तासांनी पोचेल असे सांगण्यात येते. पृथ्वीपासून चंद्र 2,25,000 मैल दूर आहे. या काचेच्या त्रिशंकूने चंद्रावर धडक मारली नाही तर तो हजारो मैल मागे येऊन सूर्याभोवती फिरू लागेल. तसे झाले तर सूर्याभोवती फिरणारा हा पहिलाच मानवनिर्मित ग्रह होईल. चंद्रवेधी अग्निबाण पृथ्वीच्या कक्षेतून सुटून जाण्यासाठी मिनिटाभरातच ताशी 2500 मैल वेगाने जावा लागतो.
लाहोर शहर संपूर्ण चिखलमय होण्याचा धोका!
लाहोर – सुमारे 2000 वर्षांपूर्वी वसलेले लाहोर शहर संपूर्ण चिखलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिंधू नदीच्या खोऱ्याचे प्रदेशात वसलेल्या लाहोर आदि बऱ्याच पाक व भारताचे शहरांना आणि खेड्यांना हा धोका निर्माण झाला आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी उत्तरोत्तर वाढत आहे म्हणून ही आपत्ती कोसळण्याची शक्यता आहे असे म्हणतात. सुमारे दोन तपापूर्वी विहिरीचे पाणी मिळण्यासाठी निदान 50 फूट खुदाई करावी लागत असे. सध्या लाहोर येथे 7 ते 15 फुटांवर पाणी लागते. यासंबंधी वेळीच उपाययोजना न केल्यास लाहोर चिखलाचे डबके व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा पश्चिम पाक पाटबंधारे खात्याने पाहणीनंतर दिला आहे. 1933 सालीच या धोक्याची कल्पना आलेली होती.
कराची विद्यापीठाच्या भूगोल शाखेने केलेल्या पाहणीत म्हटले होते की, घरे पडण्याचे सत्र सुरू झाल्याने 10 खेडी खाली करावी लागली. 1935 साली 200 खेड्यांवर ही आपत्ती आली होती.