पाक युद्धकैद्यांवर खटले भरण्याचा निर्धार पक्का!
डाक्का, ता. 7 – पाकयुद्ध कैद्यांविरुद्ध खटले भरण्याचा निर्धार आज परत एकदा बांगला सरकारने जाहीर केला. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे खास दूत पी. एन. हक्सर यांनी आज दुसऱ्या दिवशी देश परराष्ट्र मंत्री कमाल हुसेन यांच्याशी बोलणी केली. त्यानंतर बोलताना हुसेन यांनी युद्धकैद्यांवर खटले भरणारच, असे सांगितले.
रशियन नेत्यांशी संरक्षण विषयक गरजांची जगजीवनराम चर्चा करणार
नवी दिल्ली – “झपाट्याने बदलणारी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मी रशियाच्या दौऱ्यात, रशियन लष्करी अधिकारी व नेते यांच्याबरोबर भारतीय सुरक्षितता आणि संरक्षण विषयक गरजा याविषयी चर्चा करणार आहे’, असे स्वंरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी सांगितले.
हिप्परगा तलाव दुरुस्तीसाठी शिकस्तीचे प्रयत्न
पुणे – सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिप्परगा बंधाऱ्याचा 3 मीटर खचलेला भाग दुरुस्त करण्याचे काम रात्रन्दिवस चालू आहे. आज पाऊस नसल्याने पाणी वाढले नाही. तज्ज्ञांनुसार बंधाऱ्यास धोका नाही.
पुण्यात धरणे भरली
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, भाटघर, भंडारदरा, वीर या धरणांतील पाण्याचा साठा वाढत आहे. मुळा-मुठा नदीस पूर आला आहे. मात्र धोक्याची शक्यता नाही.
रॉकेल : भरपूर आहे! गर्दी करू नका
पुणे – शासनाने चालू महिन्यापासून केरोसिनवरील कपात रद्द केली आहे. तेव्हा ह्या महिन्यापासून रॉकेल पुरवठा पूर्ववत नियमित चालू राहणार असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये.