चीनमध्ये असंतोष
मॉस्को, दि. 21 – चीनच्या अनेक प्रांतांत आर्थिक प्रश्नांमुळे कामगार व शेतकरी यांचा असंतोष उफाळून येत असल्याच्या बातम्या येथील वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. या बातम्यांत चिनी वृत्तपत्रांतील बातम्यांचाही उल्लेख आहे. चेकियांग प्रांतात हॅंग चो या ठिकाणी “वर्गवाद्यांनी’ घातपाताचे प्रकार केल्याने उत्पादनात अडथळे आले आहे.
कर्जातून मुक्तीसाठी वटहुकूम
मुंबई – ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यांना, ग्रामीण धंदेवाल्यांना, कामगारांना सावकारांच्या कर्जातून मुक्त करण्यासाठी मदत म्हणून महाराष्ट्र सरकारने वटहुकूम जारी केला आहे.
“व्हायकिंग’चे मंगळाच्या दिशेने उड्डाण
केप कॅनाव्हेरॉल (फ्लोरिडा) – “व्हायकिंग’ हे अमेरिकेचे अंतराळयान येथून काल सायंकाळी मंगळाकडे रवाना झाले. साडेपन्नास कोटी मैलांचा प्रवास करून ते 303 दिवसांनी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल व नंतर मंगळावर उतरेल. ही मोहीम 100 कोटी डॉलर्सची आहे.
मंगळाच्या कक्षेत यान प्रवेश करील अशी अपेक्षा आहे. नंतर उतरण्याची जागा निश्चित करण्यासाठी 2 आठवडे लागतील. दुसरेही एक “व्हायकिंग’ यान अमेरिका सोडणार आहे. ते मंगळावर दुसऱ्या ठिकाणी उतरविण्याचा शास्त्रज्ञांचा बेत आहे.