वीज मंडळावर कामगारांचा प्रतिनिधी नेमण्यात येणार
मुंबई, दि. 21 – महाराष्ट्र राज्य वीज मंडळावर सरकार वीज कामगारांच्या एका प्रतिनिधीची नेमणूक पुढील आठवड्यात करील, असे राज्याचे ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री उदयसिंह गायकवाड यांनी जाहीर केले.
ते म्हणाले, राज्यात वीज कामगारांचे 3 महासंघ आहेत, परंतु सर्वांतर्फे एक प्रतिनिधी कोण असावा याबाबत गेली दोन वर्षे एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे याबाबतीत आता सरकारच निर्णय घेणार आहे. दरवर्षी हा प्रतिनिधी अशा रितीने बदलला जाईल, की प्रत्येक महासंघाला प्रतिनिधित्व मिळावे.
“सोयूझ’ यानाचे पृथ्वीवर सुखरूपपणे पुनरागमन
मॉस्को – अमेरिकेच्या “अपोलो’बरोबर ऐतिहासिक संयुक्त अंतराळ मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून “सोयूझ-19′ हे रशियाचे अंतराळयान आज सुखरूपपणे परत आले. कझाकस्तानातील आर्कालिक शहराच्या ईशान्येला “सोयूझ’ पृथ्वीवर उतरले. दूरचित्रवाणीवर या पुनरागमनाचे रंगीत चित्रण दाखविण्यात आले.
अमेरिकेतही ते दिसले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियन कम्युनिस्ट पक्षप्रमुख ब्रेझनेव्ह यांना अभिनंदनपर संदेश पाठविला असून त्यात म्हटले आहे, की ही संयुक्त अंतराळ मोहीम म्हणजे रशिया व अमेरिका यांच्यातील शांततेचे प्रतीक आहे.