मंत्र्याबरोबर लवाजमा नको
पुणे, दि. 21 – शासकीय कामाची गती वाढविण्यासाठी यापुढे मंत्र्यांनी आपल्या दौऱ्याच्या वेळी तसेच जाहीर कार्यक्रमाच्या वेळेस कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मोठ्या लवाजम्यासह फिरू नये, असा आदेश अखिल भारतीय कॉंग्रेसने दिला असल्याचे समजते. येथून मागे कोणत्याही दौऱ्यात अथवा कार्यक्रमात मंत्र्याबरोबर तेथील स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा दिसून येत असे. त्यात सामान्य कार्यकर्त्यांचा अभावच असे. त्यामुळे मंत्र्यांचा अधिक वेळ त्यांच्याबरोबर चर्चा करण्यातच जात असे म्हणून नव्या धोरणानुसार कॉंग्रेस कमिटीने हा आदेश दिला असावा. पुण्यात असलेल्या दोन-तीन मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस या आदेशाचे प्रत्यंतर दिसून आले.
साडी व कुंकू यांचे मेक्सिकनांचा आकर्षण
मुंबई – मेक्सिकन लोकांना भारतीय स्त्रियांची “साडी’ फार आवडली शिवाय भारतीय महिलांच्या कपाळावरील “कुंकुम तिलक’चे त्यांना मोठे कुतूहल वाटले, असे मेक्सिको येथे भरलेल्या परिषदेला हजर राहून परत आलेल्या प्रभा राव यांनी सांगितले. राव या महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, आपल्या व मेक्सिकन लोकांच्या खाण्याच्या सवयी समान वाटतात. आपल्याप्रमाणे त्यांच्या खाण्यात मिरचीचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मेक्सिको येथील परिषदेचे अनुभवही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. परिषदेत मांडण्यात आलेले मुद्देही त्यांनी स्पष्ट केले.