सबकुछ पंचतारांकित आहे. हॉटेलं, महागड्या गाड्या, बसेस, चार्टर्ड विमानं… सगळंच! यांची राहणीही पंचतारांकित. यांचं राजकारणसुद्धा पंचतारांकित. यांच्या मागं मागं फिरणाऱ्या, कधी मोटारीचा तर कधी बसचा पाठलाग करणाऱ्या मीडियाच्या कॅमेऱ्यांची नजरसुद्धा पंचतारांकित!
यांनी नजरेआड राहू नये म्हणून निवडलेला तुरुंगही पंचतारांकित आणि काहीजण नजरेआड जाण्यात यशस्वी ठरले, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी सजवलेला शामियानाही पंचतारांकित. कधी मुुंबईत, कधी सुरतेत, कधी अहमदाबादेत… पंचतारांकित गजबज आणि पंचतारांकित लगबग. विशिष्ट विचारसरणीला “पंचतारांकित’ शब्दाचीच ऍलर्जी; पण या शब्दाशिवाय पान हलतंय का, सांगा! आजकाल गोरगरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांची आखणीसुद्धा पंचतारांकित छताखाली होते. इथंच पक्षांचे जाहीरनामे छपाईसाठी तयार होतात. इथंच प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी पिता-पिता पर्यावरणाच्या ऱ्हासावर गंभीर चिंता व्यक्त केली जाते आणि त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी धोरणही ठरवलं जातं.
पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याचे निर्णय भले लोकप्रतिनिधींच्या सभागृहात घेतले जात असतील; पण काम मंजूर झाल्यानंतर ते सुरू होईपर्यंतचं अंतर पंचतारांकितच असतं. राजकीय जोडतोडही पंचतारांकित छताखालीच होते आणि त्या जोडतोडीपासून बचावासाठी इथंच आमदारांना “मानानं’ ठेवलं जातं. इथंच महत्त्वाच्या बैठका होतात. शपथा वगैरे घेतल्या जातात. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशिक्षण आणि उद्बोधन वर्ग होतात. स्ट्रॅटेजी वगैरे ठरवली जाते. पत्रकार परिषदा होतात. दावे, वादे, प्रतिज्ञा आदी केल्या जातात.
हे पंचतारांकित विश्व काही दिवस टीव्हीच्या पडद्यावर दिसतं आणि एकदा का ते नजरेआड झालं की वास्तव दिसायला लागतं. गेले दोन आठवडे जिकडं-तिकडं पंचतारांकित दिसतंय. ज्या निवडणुका पूर्वी आलेल्याही कळत नसत आणि गेलेल्याही कळत नसत त्या चांगल्याच “गाजून’ गेल्या आणि आता सगळं शांत होईल, असं वाटत असताना पुन्हा पंचतारांकित विश्व डोळ्यासमोर नाचू लागलं. मतमोजणीच्या रात्री काहीजण मतांवर आक्षेप वगैरे घेण्यात गुंतले होते, त्याच वेळी काही गाड्या महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये दाखल होत होत्या. पूर्वी एकदा भल्या सकाळी शपथविधीची बातमी आली होती, तशी भल्या सकाळी फुटाफुटीची बातमी आली. त्या पाठोपाठ महाराष्ट्राच्या हितासाठी गुजरातेत (आणि महाराष्ट्रातसुद्धा) हालचाली वाढल्या.
इकडे मुंबईत जी पत्रकार परिषद एरवी भल्या सकाळी ताज्या-ताज्या जोशात होते, ती संध्याकाळसारख्या मूडमध्ये झाली. पाठोपाठमुंबईच्या पंचतारांकित हॉटेलांमधले कॅमेरे सुरतेच्या पंचतारांकित हॉटेलात पोचले. दुपारच्या वेळी तडजोडीच्या प्रयत्नासाठी इकडून तिकडे गेलेल्या नेत्यांच्या गाड्या सुरतेच्या रस्त्यांवर धावल्या. आधी या मंडळींना मिळालेला पंचतारांकित हॉटेलचा पत्ताच चुकला. त्यामुळे त्यांच्यामागे फिरणाऱ्यांची बातमी चुकली. त्यांना नेमकं पंचतारांकित हॉटेल सापडेपर्यंत ती दोन्ही हॉटेलं मराठीजनांना घरबसल्या आळीपाळीनं बघायला मिळाली.
संध्याकाळ होता-होता बातम्यांचा ढीग साठला. कुणावर दबाव आला, कुणाला मारहाण झाली, कुणाला हृदयविकाराचा झटका आला, यंदा आषाढीची पूजा कोण करणार वगैरे असंख्य घटना-घडामोडी आणि चर्चा सुरूच राहिल्या; पण बातम्यांमध्ये व्हरायटी असली तरी एक साधर्म्य होतं. या सगळ्या बातम्या पंचतारांकित छताखालून येत होत्या. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जे पंचतारांकित विश्व कालच आमच्या दृष्टीआड गेलं असतं, त्याला आणखी एक्सटेन्शन दिल्याबद्दल धन्यवाद.