जागतिक क्रांतिकारक माओ-त्से-तुंग यांचे देहावसान
चीनचे अध्यक्ष व लाल चीनचे राष्ट्रपिता, 82 वर्षांचे माओ-त्से-तुंग दीर्घकालीन आजारानंतर निधन पावले. चीनमधील जनता माओंना परमेश्वराप्रमाणे मानत असे. चीनचा आमूलाग्र कायापालट ज्यामुळे घडला, त्या “महान क्रांतीची’ माओ हीच स्फूर्ती होती. या क्रांतीने जगभर “धक्के’ बसले.
आतापर्यंत इतकी सत्ता इतक्या प्रचंड जनसंख्येवर गाजविणारा माओ हा जगात एकमेवाद्वितीय नेता होता. सन 1920 मध्ये माओ यांनी स्वतःला “मार्क्सवादी’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी राजकीय उद्देशाने कामगारांचे लढे संघटित केले. 1921 साली चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. पक्षाच्या पहिल्या 12 सदस्यांपैकी ते एक होते.
चीनच्या स्वातंत्र्य लढ्यातील कम्युनिस्ट सैनिकांच्या “लॉंग मार्च’चे नेतृत्व माओंनी केले व तेव्हापासून माओ ही एक “आंतरराष्ट्रीय व्यक्ती’ बनली. 1949 साली ऑक्टोबरमध्ये चीन स्वतंत्र झाला. राष्ट्राध्यक्षपदी माओंची नेमणूक झाली. 1966 साली “सांस्कृतिक क्रांती’ची घोषणा माओंनी केली.
त्यांचा असा दावा होता की, “शुद्ध साम्यवादा’च्या दृष्टीने ते एक पुढचे पाऊल आहे. 1970 साली चीनने राष्ट्रसंघात प्रवेश केला. रशियाशी संबंध मात्र बिघडले. माओ “काव्यप्रेमी शेतकरी’ होते. ते कधीही विश्रांती घेत नसत. कोरियन युद्धात माओंचा मुलगा मारला गेला होता. माओ यांच्या निधनाबद्दल भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी दूतावासातर्फे चीनला शोकसंदेश पाठविला.