-डॉ. मेघश्री दळवी
हॉस्पिटल म्हटलं की नजरेसमोर येते रुग्णांची गर्दी, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि परिचारिकांची धावपळ. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांना मदत करणे, रुग्णांची काळजी घेणे, यासोबत परिचारिकांना अनेक वेगवेगळी कामे पार पाडायची असतात. उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे असो, रक्ताचे नमुने लॅबमध्ये देणे असो, की रुग्णांसाठी खोली तयार करून ठेवणे असो परिचारिकांचे काम कधी संपतच नाही. म्हणूनच अमेरिकेतल्या ऑस्टिनमधल्या डिलिजन्ट रोबोटिक्स कंपनीने यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे. परिचारिकांसाठी मदतनीस रोबोट.
‘मॉक्सी’ नावाच्या या रोबोटला एक लांबलचक हात आहे. या हाताने वस्तू उचलणे आणि सोबत घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊन देणे हे काम ती लीलया करू शकते. खाली चाकं असल्याने मॉक्सी भराभर ये-जा करू शकते. हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांच्या डिजिटल नोंदी ती आवश्यकतेनुसार बघून रुग्णांची औषधं वेळच्यावेळी नेऊन देऊ शकते. रुग्णाला डिसचार्ज दिला की गादी बदलणे, खोली पूर्ण निर्जंतुक करून घेणे, पुढच्या रुग्णासाठी तयारी करून ठेवणे अशा काही ठराविक गोष्टींची पूर्ती करावी लागते. ही कामं मॉक्सी सहज पार पाडते. त्यामुळे परिचारिकांवरचा ताण कमी होतो आणि त्या रुग्णांकडे पूर्ण लक्ष देऊ शकतात.
मॉक्सीला आपण सूचना देऊ शकतो आणि तिच्या प्रोग्राममध्ये जरुरी असेल त्याप्रमाणे लहानमोठे बदल करू शकतो. त्यामुळे परिचारिका अगदी सहजपणे मॉक्सीचा वापर करू शकतात. मॉक्सीच्या वेगवेगळ्या चाचण्या प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये झाल्या, त्यात तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले. तिथल्या रुग्णांनाही ही एक हाताची ह्यूमनॉइड रोबोट आवडली. मान किंचित वळवून रुग्णांकडे बघण्याची तिची ढब त्यांना हुबेहूब माणसासारखी वाटली.
रोबोट्सचा वापर वाढत जाईल तेव्हा आपण माणसांना हळूहळू त्यांची सवय होईल, आजूबाजूला त्यांचा वावर असेल तेव्हा अवघड वाटणार नाही, त्यांच्याशी सहज संवाद साधण्याचा आपल्याला सराव होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत असते. मॉक्सीचा वावर हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या पचनी पडला असेल तर उत्तमच, असं डिलिजन्ट रोबॉटिक्स कंपनीचं मत आहे. मॉक्सी बोलू शकत नाही, पण रुग्णांकडे बघताना ती डोळ्यांमध्ये बदाम दाखवू शकेल अशी रचना आता केली आहे, तेवढीच गंमत म्हणून.
परिचारिका मॉक्सीला आपल्यात कसं सामावून घेतील हा मोठा प्रश्न तिच्या निर्मात्यांना पडला होता. प्रत्यक्षात अशी न थकणारी, पटापट कामं उरकणारी, तत्पर आणि आज्ञाधारक मदतनीस त्यांना खूप पसंत पडली आहे. प्राथमिक पातळीवरची कामं तिच्यावर टाकून वैद्यकीय कामं आपण करायची ही व्यवस्था त्यांना अतिशय सोयीची ठरते आहे. त्यामुळे रोबोट्स आल्यावर आमच्या नोकऱ्या जातील अशी ओरड होणारच नाही. उलट आपलं काम हलकं करणाऱ्या या मॉक्सी रोबोटचं परिचारिकांनी स्वागतच केलं आहे.