संडेस्पेशल : अहंकार ही विषवृत्ती

-अशोक सुतार

लोकांशी सुसंवाद साधणे सर्वांनाच जमते असे नाही, सुसंवाद साधणे अवघडही नाही. कारण कसे वागायचे ते आपल्या अंतर्मनात असणे महत्त्वाचे असते. मनातून मेंदूकडे असा विचारप्रवाह क्षणार्धात जाऊन माणसाचे वर्तन सुरू होते. तुम्ही पेराल तेच उगवते. कारण तुम्ही चांगले वाईट क्रिया कराल, तशाच प्रकारची प्रतिक्रिया तुम्हाला मिळेल.

तुम्ही दुसऱ्यांशी हसतमुख बोलत संभाषण केले तर समोरची व्यक्‍ती कितीही निष्ठूर असली तरी त्या व्यक्‍तीचा स्वभाव थोडावेळ तरी बदलू शकतो. ही प्रक्रिया सातत्याने होऊ लागली तर अशा माणसांचे स्वभाव पूर्ण बदलायला वेळ लागत नाही. आज अहंकार या विकाराने अनेकजण ग्रस्त आहेत.

अहंकार हा सकारात्मक विचारांतील मोठा अडसर आहे, तो प्रगतीला मारक आहे. काही माणसे स्वतः शहाणे असल्याचा दावा करून आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. माणसांमध्ये मनोविश्‍लेषण करण्याची क्षमता जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत अहंकाराचे साम्राज्य माणसाच्या मेंदूवर हुकूमशाहीचे राज्य करेल.

व्यक्‍तीला मिळणारी प्रसिद्धी, चारचौघांत मिळालेला मोठेपणा यामुळे स्वतःबद्दल अहंभावना निर्माण होते. ही भावना व्यक्‍तीचे मन दुबळे करते. अशी माणसे बाह्यप्रेरणेवर अवलंबून असतात, अंतर्मनाचा विचार घेत नाहीत किंवा अंतर्मनात जाऊन स्वतःशी संवाद साधत नाहीत. अहंकार उफाळून येतो तेव्हा माणसाची अवस्था फुत्कार मारणाऱ्या सर्पासारखी असते.

अहंकाराची दुसरी अवस्था आहे ती म्हणजे लोक माझ्याकडे येतील, मी लोकांकडे जाणार नाही. मी तर मोठा आहे अशी हीन भावना मनात ठेवून माणसे स्वतःभोवती अहंकाराचा पिंजरा उभे करीत आहेत. समतामूलक समाजनिर्मिती करण्यास अहंकार मोठा अडसर आहे. त्यामुळे समाज दुभंगला जाण्याचा धोका अधिक आहे.

काही व्यक्‍ती दुसऱ्याचा नेहमी तिरस्कार करतात, तेजोभंग करतात. असे म्हटले जाते की, अहंकारी व्यक्‍तीचे जग त्याच्यापासून सुरू होऊन त्याच्यापाशीच येऊन समाप्त होते. इतरांनी आपल्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, अशी अहंकारी व्यक्‍तीची मनोभावना असते. अशा व्यक्‍ती कोणाचाही सल्ला मानत नाहीत. कारण दुसरा व्यक्‍ती आपल्यावर कुरघोडी करून नुकसान करेल अशी शंकाही अहंकारी व्यक्‍तीच्या मनात असते. स्वतःबद्दल अभिमान असणे ही एक मूलभूत प्रवृत्ती आहे पण तिचा वागण्यात अतिरेक झाला तर ती अहंकारात परावर्तित होईल. अहंकार नावाची विषवृत्ती तुमच्या प्रगतीला नुकसान पोहोचवेल.

काही लोकांना दुसऱ्यांना दोष देण्याची, कुचाळक्‍या करण्याची सवय असते. आपल्या बोलण्या-वागण्यामुळे दुसऱ्यांना काय वाटेल, याचा विचार हे लोक करीत नाहीत. काही लोकांजवळ बुद्धिमत्ता, कला असते पण अहंकार विकाराने ग्रस्त असल्याने आयुष्यात अपेक्षित यश मिळवता येत नाही.

तुमच्या यशोमार्गावर आपल्या मनोविकृतीच्या बिळातून अहंकार नावाचा सर्प येतो आणि तुम्हालाच तो डसला जातो. अशा विषविचारी रोगाला कायमचे हद्दपार करायचे असेल तर तुम्हाला अहंकार सोडावा लागेल. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे ऐकून घ्या. इतरांच्या सकारात्मक विचारांवर विचार करा. मी या जगात महत्त्वाचा आहे त्याप्रमाणेच इतरही लोक महत्त्वाचे आहेत असा विचार करा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×