भारताबरोबरचा तणाव द्विपक्षीय चर्चेतून कमी करा

ट्रम्प यांची पाकिस्तानला सूचना

इस्लामाबाद  -भारतविरोधी उठाठेवी करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी भारताबरोबरचा तणाव द्विपक्षीय चर्चेतून कमी करा, अशी स्पष्ट सूचना ट्रम्प यांनी इम्रान यांना केली.

काश्‍मीरवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होण्याआधी इम्रान यांनी ट्रम्प यांना फोन लावला. भारतविरोधी कांगावा करण्यासाठीच इम्रान यांनी ती धडपड केली. मात्र, ट्रम्प यांनी त्यांना भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होणे महत्वाचे असल्याचे सुनावले.

सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी ट्रम्प यांना विश्‍वासात घेण्यासाठी इम्रान यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी म्हटले होते.

मात्र, इम्रान यांच्या फोनने काहीच साधले नसल्याचे स्पष्ट झाले. कारण सुरक्षा परिषदेच्या बैठकीतील चर्चेवेळी भारताच्या बाजूने उभ्या राहिलेल्या बहुतांश सदस्य देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश असल्याचे समजते. बहुतांश सदस्य देशांच्या भूमिकेमुळे त्या बैठकीतून पाकिस्तानच्या हाती काहीच लागले नाही.

जम्मू-काश्‍मीरशी संबंधित घडामोडी आमची अंतर्गत बाब असल्याची ठाम भूमिका भारताने घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. मात्र, पाकिस्तानकडे आंतरराष्ट्रीय समुदाय लक्ष देत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×