गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने त्याचा “गुजरात पॅटर्न’ दाखवला होता. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये रस्त्यात साचलेल्या पाण्यात चारचाकी गाड्या तरंगताना दिसल्या होत्या. पूर्णपणे जलमय झालेल्या इलाख्यांमध्ये मेहसाणा जिल्ह्याचाही समावेश होता. आज मात्र हा मेहसाणा जिल्हा वेगळ्याच पावसामुळे चर्चेत आलाय. हा पाऊस आहे नोटांचा..!
रस्त्यावर भरपूर गर्दी आहे, लाऊडस्पीकर वाजत आहे आणि आकाशातून नोटांचा वर्षाव या गर्दीवर होत आहे. दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतच्या या नोटा गोळा करण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यासाठी ढकलाढकली आणि धक्काबुक्की सुरू आहे, असं चित्र बराच काळ दिसत होतं.
अंगोल नावाचं हे गाव केकरी तालुक्यात आहे. गावच्या माजी सरपंचांच्या पुतण्याचं लग्न होतं. नवऱ्या मुलाची म्हणजे रज्जाकची वरात गावातून निघाली, तेव्हा त्याचे काका करीमभाई दादूभाई जादव यांच्यासह कुटुंबातले काही लोक घराच्या गच्चीवर गेले आणि तिथून नोटा उडवायला सुरुवात केली. वरातीच्या वेळी पार्श्वभूमीला “जोधा अकबर’ चित्रपटातलं “अजीमो-शान शहनशाह’ हे गाणं वाजत होतं आणि या शहनशाहचे काका नोटा उधळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्याची प्रथा असून, त्याच वेळी हा “श्रीमंती पॅटर्न’ दिसला. लाखो रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी घरासमोर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरीही झाली. वृत्तवाहिन्यांवर नोटाफेकीचा नुसता व्हिडिओ पाहूनसुद्धा लोक सर्द झाले.
नोटा उधळण्याचा हा प्रकार आपल्याकडे “दौलतजादा’ नावानं ओळखला जातो. पूर्वी लावणीच्या बैठकीला नृत्यांगनेवर आणि काही वर्षांपूर्वी बारबालांवर अशी “दौलतजादा’ करण्यात येत असे. वस्तुतः खानदानी श्रीमंतांना त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची गरज नसते आणि हौसही नसते. ही खुळसट प्रवृत्ती नवश्रीमंतांमध्ये अधिक प्रमाणात दिसते. विशेषतः नव्वदीच्या दशकात उदारीकरणाची धोरणे स्वीकारल्यानंतर अशा कुटुंबांची संख्या वाढली. त्याहून कितीतरी पटींनी श्रीमंत-गरिबांमधली दरी वाढली, हेही खरंच; परंतु ज्यांच्या हातात पैसा टिकत नव्हता, त्यांच्या खिशात तो मुबलकपणे खुळखुळू लागल्याचे अनेक किस्से आपल्या अवतीभवती घडले. जे आक्रमकपणे या नवउदारवादाला भिडले, त्यांची चांदी झाली. औद्योगिक वाढीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे जमिनींच्या किमती रातोरात अनेकपटींनी वाढल्या.
या सगळ्या मंथनातून श्रीमंतीचं वारं लागलेला वर्ग पैशांचं उथळ प्रदर्शन करू लागला. किलोकिलोचे दागिने अंगावर मिरवणं, सोन्याचे कपडे शिवणं, मोठमोठ्या मोटारी विकत घेणं, त्यातून विनाकारण फिरणं आणि फिरवणं, सतत पार्ट्या करणं असा दिखाऊपणा वाढत गेला. गल्लीतल्या “युवा नेत्यां’चे रस्त्यात केक कापून साजरे होणारे वाढदिवस, डीजे-डॉल्बी, फटाके ही सगळी याच नवश्रीमंत संस्कृतीची रूपं. लग्नात नोटा उधळणं हा त्यातलाच प्रकार!
आपल्याकडे श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत दिसण्याला महत्त्व दिलं जातं, त्यालाही आपणच कारणीभूत आहोत. नाकासमोर चालणाऱ्या आणि पोटापुरतं कमावताना कुणाला न दुखावणाऱ्या, कुणाच्या तोंडचा घास न हिरावणाऱ्या साध्यासुध्या माणसाचं आपल्याला कौतुक राहिलेलं नाही. उलट उथळ उधळपट्टीवाल्यांकडे आपण लगेच आकर्षित होतो. पैसा आहे म्हणून लोक आपल्या मागे येतात, याची संबंधितांना खात्री असते. कष्टानं मिळवलेल्या नोटा कुणी उधळत नाही… पण उधळलेल्या नोटा गोळा करायलाही कष्ट पडतात, हाच दुर्दैवी विरोधाभास..!