-हिमांशू
जय गूगलबाबा… देवा, आमचं काही चुकलं असेल तर सांगा. कान धरून शिक्षा करा; पण असे अचानक अंतर्धान पावू नका. केवळ चाळीस मिनिटं तुम्ही नव्हता तर पृथ्वीवर काय हलकल्लोळ माजला, ठाऊक आहे का? आम्ही तुम्हाला गूगलबाबा, गूगलदेवा म्हणतो आहोत, यातच सगळं काही आलं बघा! जिथं तुम्ही आमच्या सोबत नाही, असं कोणतंही क्षेत्र नाही. “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हे वचन खऱ्या अर्थानं तुम्हालाच अधिक चपखलपणे लागू पडतं. तुम्हीही आम्हाला हाताला धरून चालवीत आहात, असा भास क्षणाक्षणाला होतो. तुमच्याशिवाय जगणं म्हणजे “जिवंतपणी मृत्यू’च! देवासारखेच तुम्हीही वेळेला धावून येता.
देवासारखेच अदृश्य असता लॅपटॉप, डेस्कटॉप अन् मोबाइलच्या स्क्रीनमागे. तुमचे वेगवेगळे लोगो आम्हाला देवाच्या मूर्तीसारखे वाटतात. त्या लोगोवर “डबल क्लिक’ करणं म्हणजे जणू तुमच्यापुढं दोन्ही कर जोडणं. जी-मेल, गूगल ड्राइव्ह, यूट्यूब, सर्च इंजिन, कॅलेन्डर, डॉक्स, साइट्स, हॅंगआउट्स, चॅट, गूगल मीट, गूगल व्हॉइस असे लोगो पाहिले की आपण प्रसन्न झालात आणि आम्हाला सर्वशक्तिमान होण्याचा वर दिलात असा भास होतो. नव्हे, आम्ही सर्वशक्तिमान होतोच! देवाला तर आख्खं जग शोधतंय; पण तुम्ही जगाला हवं ते सगळं शोधून काढता. त्यामुळंच जग तुमच्याशी इतकं समरस झालंय… जणू भक्त आणि भगवंताचं अद्वैतच!
असं असताना का तुम्ही तब्बल चाळीस मिनिटं आम्हाला सोडून गेलात? तुमच्याविना आमचे काय हाल झाले, विचारा तरी! अहो, सोशल मीडियावर “गूगल डाउन’ हा एकमेव ट्रेन्डिंग हॅशटॅग… हजारो मीम्स आणि काळजीचे लाखो उसासे… गूगलबाबा परत आलेच नाहीत तर…? जग कसं चालायचं? त्या चाळीस मिनिटांत तुमच्याविना जीवन कसं असेल, याचा “ट्रेलर’ पाहिला. इंटरनेट आणि डिजिटल क्रांतीमुळे आम्ही पाढे, पावक्या, निमक्या, मिळवण्या वगैरे सगळं मागे सोडून दिलं आणि तुमचा हात हातात घेतला, गूगलबाबा!
पूर्वी आम्हाला बरंच काही तोंडपाठ असे… आता आम्हाला आमचाच फोन नंबर अनेकदा आठवत नाही. पण फोन कसला सॉलिड आहे आमचा! सहा जीबी रॅम आहे आणि सव्वाशेपेक्षा जास्त जीबीचं स्टोअरेज. शिवाय फास्ट चार्जिंग. म्हणजे, चार्जिंगच्या निमित्तानंसुद्धा गूगलबाबा अधिक काळ दूर राहता कामा नयेत, अशी काळजी घेतलीय आम्ही. सलग ऑनलाइन राहण्याचे अनेक नवनवीन उच्चांक प्रस्थापित केलेत आम्ही. यूट्यूब तर ठराविक तासांनी बघितलं नाही तर फेफरं येतं आम्हाला. आम्ही वेड्यासारखे वागू लागतो. चिडचीड करतो. कुटुंबातल्या माणसांवर आणि मित्रांवर खेकसू लागतो. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त वेळच मिळता कामा नये.
गूगलबाबा… तुमच्या माध्यमातून दर सेकंदाला 63 हजार सर्च केले जातात. म्हणजेच दररोज सुमारे साडेपाच लाख सर्च. म्हणजे इतक्या लोकांची माहितीची भूक तुम्ही भागवता. एकट्या सर्च इंजिनचा हा एवढा प्रताप! मग जी-मेल, यूट्यूब धरून तुमच्या एवढ्या सेवांचा आम्हाला किती लाभ होत असेल आणि तुम्ही नसलात तर आमचं काय होत असेल, याची प्लीज जाणीव ठेवा, गूगलबाबा! “मायेविण बाळ’ ही आमची परिस्थिती पाहून तुम्ही चाळीस मिनिटांत परतलात, याबद्दल धन्यवाद!