कांगारूंच्या देशात : अनाकलनिय आणि बेजबाबदार

-अमित डोंगरे

कर्णधार विराट कोहली हा संघाचे नेतृत्व करत असल्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडलेला संघ पाहून विश्‍वास बसत नाही. भरात असलेल्या लोकेश राहुलला संघाबाहेर ठेवून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पृथ्वी शॉ याला संघात स्थान देण्यामागे कोहली व रवी शास्त्री यांची काय भूमिका होती हे त्या जगनियंत्यालाच ठाऊक. 

पृथ्वी शॉ सातत्याने अपयशी ठरुनही त्याला ऋषभ पंतप्रमाणे सातत्याने संधी मिळत आहे. दुसरीकडे तुफान भरात असलेला लोकेश राहुल पाणक्‍या बनला आहे. जर शिखऱ धवन संघात नाही तर एकतरी अनुभवी फलंदाज सलामीला हवा हे कोहली व शास्त्री यांच्या लक्षात आले नाही का, असा प्रश्‍न पडतो. या सामन्यासाठी निवडलेला संघ पाहिला की कोहली व शास्त्री यांना निवड समितीच्या हाताला हात लावून ममं म्हणावे तर लागत नाही ना, असेच वाटत आहे.

हे ही नसे थोडके, नाणेफेक जिंकत कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. हिवाळ्याच्या दिवसांत खेळपट्टीवर दव आणि थंड वातावरणात हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्याच पथ्यावर पडला. भारताची फलंदाजी सुरु झाल्यावर पृथ्वी शॉ डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यावेळी मयंक आग्रवाल व चेतेश्‍वर पुजाराने किल्ला लढवला. मात्र, आग्रवालही स्वस्तात परतला. कर्णधार कोहली व पुजारा आणि कोहली व अजिंक्‍य रहाणे यांनी डाव सावरला.

पुजाराने नेहमीप्रमाणे संथ फलंदाजी केली. त्यावेळी ही डावाची गरज होती हे मान्य पण एकेरी दुहेरी धावा घेण्याचाही त्याने प्रयत्न केला नाही याचेच आश्‍चर्य वाटते. त्याला कोणीतरी सांगायला हवे की खेळून काढलेले चेंडू म्हणजे धावा नव्हेत, त्या वेगळ्या काढाव्या लागतात. पॅट कमिन्स व मिशेल मार्श यांच्या अत्यंत अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना धावा काढणेही मुश्‍कील बनले होते. पुजाराचा बचाव भेदताना नाथन लायनने जो चेंडू टाकला त्यामुळे जगभरातील ऑफस्पीन गोलंदाजही आश्‍चर्य व्यक्त करतील.

कोहलीने अत्यंत जबाबदारीने व संयमाने फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. तो यंदाच्या वर्षात पहिले शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच रहाणेने नसलेली धाव घेण्याच्या नादात कोहलीला चुकीचा कॉल दिला व धावबाद केले. ही संपूर्ण चूक रहाणेचीच होती मात्र, त्याचा फटका संपूर्ण भारतीय संघाला बसला. कोहली एकटाच रॉक ऑफ जिब्राल्टरसारखा ठामपणे खेळपट्टीवर उभा होता. कोहली बाद झाला तेव्हा संघाचे दीडशतक पार झाले होते. रहाणेही चांगला खेळत होता. मात्र, ज्या खेळपट्टीवरील दव उपहारानंतर निघून गेले व चेंडू चांगला बॅटवर येत होता तरीही भारतीय फलंदाजांनी केलेली संथ फलंदाजी टीकेचा विषय ठरली.

रहाणेने कोहलीला बाद केले आणि नंतर स्वतःही बाद झाला. शॉ, आग्रवाल, पुजारा व रहाणे यांचे बाद होणे पाहिले तर असे विचारावेसे वाटते की मग तुमची गुणवत्ता कुठे गेली. जर सिद्धच होत नसेल तर ती गुणवत्ता काय कामाची. कोहलीमुळे निदान लाज राखली गेली अन्यथा भारताचे कागदावरचे वाघ डरकाळी न फोडताच बाद होत गेले असते. आता सामन्याचे अद्याप चार दिवस बाकी असून सामन्यात परतायचे असेल तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण राखावे लागेल व सध्यातरी तेच अशक्‍य वाटत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.