अबाऊट टर्न : सावधान!

-हिमांशू

भिलारसारखं पुस्तकांचं गाव प्रत्येक जिल्ह्यांत उभारण्याची राज्य सरकारची इच्छा आहे; पण मुद्दा असा की लोकांना तिथं जाऊन काही वाचण्याची इच्छा खरोखर आहे का? पुस्तकांमधून काही शिकायला मिळतं आणि त्याचा पुढे आपल्यालाच फायदा होतो, अशी मानसिकता नवमाध्यमांच्या जमान्यात उरलीय का?

यू-ट्यूबवरून वाद्य वाजवणं किंवा एखादी भाषा बोलणं शिकता येतं हे कळू लागेपर्यंत बातम्या येऊ लागल्या, की यू-ट्यूबवर पाहून काहीजण चक्‍क चोरी करायला शिकले. नवमाध्यमं आणि त्यावरील अवाढव्य कन्टेन्टवर लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी करणं हे प्रचंड मोठं आव्हान आहे. त्यातल्या त्यात सोशल मीडिया कंपन्यांना सरकारने नुकतंच “गोडीत’ समजावलंय; परंतु द्वेषमूलक संदेश आणि खोट्या बातम्या पसरणं न थांबता उलट वाढतानाच दिसतंय. या नवमाध्यमांच्या आगमनानंतर आपली संस्कृतीच पुरती बदलून गेलीये, याकडे फारसं गांभीर्यानं कुणी पाहिलेलं नाही.

तंत्रज्ञानाचा वापर कुठे, कसा आणि किती होतो, याचा लेखाजोखा धडकी भरवणारा आहे. म्हणूनच बारा-तेरा वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलेला आणि सध्या शिक्षक म्हणून काम करणारा माणूस जेव्हा अश्‍लील चित्रफितींच्या “व्यवसाया’चा सूत्रधार आहे अशी माहिती मिळते तेव्हा समाजमन अंतर्बाह्य हादरून जातं. या पठ्ठ्यानं दोन साथीदारांच्या मदतीनं यू-ट्यूबवर तब्बल 17 चॅनेल तयार केले आणि कोट्यवधींची कमाई लॉकडाऊनच्या काळात केल्याचं उघड झालंय.

लोकांची “गरज’ ओळखणाऱ्याला चाणाक्ष व्यावसायिक म्हटलं जातं. परंतु काही “गरजा’ या यादीत समाविष्ट नसतात; कारण त्या कोणत्याही मार्गानं पूर्ण करणं सभ्य समाजाच्या चौकटीत बसत नाही. सभ्य-असभ्य मुद्दा बाजूला ठेवला तरी मुलींना फसवून अश्‍लील चित्रफिती तयार करणं आणि त्यातून कमाई करणं केवळ आक्षेपार्हच नव्हे तर संतापजनक आहे. या मंडळींनी सुमारे 300 अश्‍लील चित्रफिती तयार करून यू-ट्यूबवर टाकल्या. त्यांना 15 कोटींपेक्षा अधिक “प्रेक्षक’ मिळाले. ज्या कन्टेन्टला मोठा प्रेक्षकवर्ग मिळतो त्यासाठी यू-ट्यूब आणि अन्य माध्यमं मानधन देतात. असंच कोट्यवधींचं मानधन या टोळीनं हडप केलं.

आता तिघांनाही अटक झालेली असल्यामुळे “मान’ आणि “धन’ दोन्ही संपुष्टात आलंय. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, यू-ट्यूबकडून मानधन घेऊन ही टोळी गप्प बसली नाही, तर प्रेक्षकसंख्या अधिक असल्याचा गैरफायदा घेऊन जाहिराती मिळवल्या आणि त्यातूनही उत्पन्न काढलं. केवळ लॉकडाऊनच्या काळात या मंडळींनी सुमारे दोन कोटींची कमाई केल्याचं पुढे आलंय. सूत्रधार शिक्षक एका खासगी क्‍लासेसमध्ये शिकवतो आणि त्याने स्वतःच्याच विद्यार्थिनींच्या चित्रफिती तयार केल्याचं पुढे आलंय. “गमतीदार’ व्हिडिओ बनविण्याच्या बहाण्याने मुलींना निर्जनस्थळी नेऊन “तशा’ व्हिडिओसाठी भाग पाडलं जाई.

“गमतीदार’ किंवा “खट्याळ’ असे शब्द वापरून हल्ली बरंच “साहित्य’ नवमाध्यमांच्या आधारे निर्माण होतंय. मुख्य प्रवाहातील माध्यमं ज्या शब्दांना कात्री लावतात, असे शब्द बिनधास्त उच्चारणं आणि प्रसारित करणं याची एक “क्रेझ’ निर्माण झालीय. नवमाध्यमांना “सेन्सॉर’ नसल्यामुळे असं “खट्याळ’ काहीतरी करणं आणि पाहणं दोन्ही वाढलंय. परंतु ही “क्रेझ’ जर फसवणुकीपर्यंत जात असेल तर अशा कन्टेन्टमध्ये काम करणाऱ्यांनीही स्वतःला थोडं आवरायला हवं. गुन्हेगार अवतीभोवतीच आहेत. त्यांना ओळखायला शिकलं पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.