पाकमधील आणीबाणी सध्या तरी उठणार नाही
नवी दिल्ली, दि. 28 – पाकिस्तानातील आणीबाणीची परिस्थिती सध्यातरी उठविली जाण्याचा संभव नाही, असे त्यांचे पंतप्रधान भुट्टो यांनी तेहरान जर्नल या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ज्या हेतूसाठी 23 नोव्हेंबर 1971 पासून आणीबाणी जारी करण्यात आली, ते साध्य झाल्याखेरीज आणीबाणी उठविणे हे वास्तवाला धरून होणार नाही, असे भुट्टो म्हणाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने चाललेल्या प्रयत्नांना भरीव स्वरूप प्राप्त होण्याच्या आड कोणतीही गोष्ट येऊ नये म्हणून आणीबाणी जारी करण्यात आली.
प्रयत्नवाद हा भारतीय संस्कृतीचा मूलस्रोत
पुणे – विश्वात्मक कल्पनेचा उगम भारतीय संस्कृतीत आहे. जगाच्या पाठीवरील कोणत्याही संस्कृतीत चतुष्पादांच्या जीवनाचा विचार नाही; पण तो भारतीय संस्कृतीत मानवाच्या जीवन विचाराबरोबर अग्रक्रमाने केलेला आहे. अखंड प्रयत्नवाद हा भारतीय संस्कृतीचा मूलस्रोत आहे, असे विचार कादंबरीकार कवी रवींद्र भट यांनी मांडले.
जनता सिनेमागृहे उभारण्याची योजना
नवी दिल्ली – देशात नजिकच्या काळात जनता सिनेमागृहांची साखळी तयार झालेली असेल. या सिनेमागृहात कमी पैशांत चित्रपट पाहता येतील.