अग्रलेख : भाजप-सेना युतीचे ‘मिशन 220’

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काही महिनेच बाकी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजप-शिवसेना युतीने “मिशन 220’ची घोषणा केली आहे आणि आगामी काळात राज्यात सर्वत्र रथयात्रा काढून जनसंपर्क वाढवण्याचा मनोदयही जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीने राज्यातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. एका लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 5 मतदारसंघ असतात, असे गृहीत धरले तर लोकसभेच्या गणिताप्रमाणे राज्यात युतीने विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त मतदारसंघात बाजी मारली असल्याचे चित्र दिसते. याच गणिताच्या आधारे फडणवीस यांनी “मिशन 220’ची घोषणा केली असेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीची गणिते भिन्न असल्याने हे “मिशन 220′ पूर्ण करण्यासाठी युतीला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत हे विसरून चालणार नाही.

एकीकडे युतीतील थोडीफार धुसफूस आणि दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून घेतलेला धडा यातून मार्ग काढून फडणवीस यांना हे मिशन पूर्ण करावे लागणार आहे. पाच वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढवली होती आणि त्यात भाजपने जास्त जागा मिळवल्या होत्या. कालांतराने भाजप आणि शिवसेना एकत्र आले तरी दोघांमध्ये दीर्घकाळ कटुता होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात ही कटुता कमी झाली आणि दोन्ही पक्ष एकदिलाने लढले. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही एकी कायम राहिली तर “मिशन 220′ फारसे अवघड जाणार नाही. पण ही एकी टिकवणे हेच मोठे आव्हान असणार आहे. कारण फडणवीस “मिशन 220’ची घोषणा करत असतानाच एकीकडे त्यांचे विश्‍वासू सहकारी गिरीश महाजन स्वबळाची भाषा बोलत होते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत होते.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे आता ठरले आहे, अशी घोषणा केली असली तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण, याचा वाद काही मिटलेला नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजप हाच मोठा भाऊ असून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येत असताना महाजन यांनी हे विधान करून विनाकारणच वाद निर्माण केला आहे. लोकसभा लढताना भाजपच्या जागा निवडून द्या, असे आम्ही म्हणालो नाही. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत होती, त्याठिकाणी आमची भाजपची टीम होती. त्यामुळे आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावा, अशी आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर देताना आमचे सारे काही ठरलंय आणि त्यात कोणी नाक खुपसू नये, असे म्हणून टोला दिला आहे. हा वाद वाढू नये म्हणून चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली असली तरी अशी धुसफूस होणार नाही याची काळजी भाजप नेत्यांना घ्यावीच लागेल. दुसरीकडे भाजप-शिवसेना युती एकत्र लढणार हे निश्‍चित असतानाही भाजपने राज्याचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना सर्व 288 जागांवर विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत आणि पूर्वतयारी करण्याचा कालबद्ध कार्यक्रमही दिला असल्याचे समजते. अशा घटनांमुळे जो अविश्‍वास निर्माण होत आहे तो युतीच्या “मिशन 220’ला हानिकारक ठरू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.

भाजप-शिवसेना एकत्र लढले तर त्यांना सत्तेवर पुन्हा येण्याची संधी जास्त आहे हे जेवढे खरे आहे तेवढेच खरे हे आहे की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी युतीला आव्हान उभे करू शकते. लोकसभा पराभवापासून धडा घेतलेली कॉंग्रेस आघाडी आगामी काळात एकत्रपणे उभी राहील असेच संकेत मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीशी त्यांची युती होते की नाही यावर सारेकाही अवलंबून असले तरी त्यांना समर्थपणे भाजप-सेने युतीशी मुकाबला करावा लागेल. आगामी तीन महिन्यांच्या काळाचा ते कसा वापर करतात हे पाहावे लागेल. फडणवीस यांनी आता राज्यपातळीवर रथयात्रेची घोषणा करून निवडणुकीच्या तयारीत बाजी मारली असल्याने विरोधक त्याला कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल.

राज्यात कोणत्याही निवडणुकीचे वारे वाहत नसताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी “संपर्क यात्रा’ आणि “संघर्ष यात्रा’ काढल्या होत्या. आता यात्रांच्या राजकारणात भाजपने बाजी मारली असल्याने आपल्या बाजूने वातावरण तापवण्यासाठी आघाडीला नवीन रणनीती आखावी लागणार आहे. एकतर महत्त्वाचे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने राज्यातील कॉंग्रेसचा पाया खिळखिळा झाला आहे. पक्षांतराचा फटका राष्ट्रवादीलाही बसला आहे. त्यामुळे एकीकडे पक्षसंघटना सावरण्याचे काम करतानाच निवडणुकीची तयारी त्यांना करावी लागेल. आगामी काळात आणखी काही विरोधी नेत्यांना पक्षात आणण्याची रणनीती भाजप राबवेल यात शंका नाही. त्या रणनीतीलाही उत्तर देण्याचे काम आघाडीला करावे लागणार आहे.

सत्तेवर असल्याने बळकट असलेले भाजप आणि शिवसेना हे पक्ष आणि सैरभैर झालेले विरोधी पक्ष, असे चित्र सध्या राज्यात आहे. भाजप आणि शिवसेना यांची पक्षसंघटना प्रभावी आहे. फडणवीस यांच्या रथयात्रेच्या माध्यमातून ही संघटना तपासून बघण्याचे काम होणार आहे. “मिशन 220′ पूर्ण करण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल म्हणून या रथयात्रेच्या रणनीतीकडे पाहावे लागेल.

गेल्यावेळी स्वतंत्रपणे लढताना भाजप आणि शिवसेना यांनी 200 चा आकडा पार केला नव्हता. दोघांचा एकत्रित आकडा 180 च्या आसपास होता. आता एकत्र लढताना हा आकडा 220 पर्यंत वाढवण्याचा पल्ला त्यांना गाठायचा आहे. विरोधी पक्ष राज्यात युतीला कसे आणि किती आव्हान उभे करतात यावरच “मिशन 220’चे भवितव्य अवलंबून आहे हे नक्‍की.

Leave A Reply

Your email address will not be published.