अर्थकारण : सेवा क्षेत्रातील मलिदा आणि चोथा!

-यमाजी मालकर

सॉफ्टबॅंकसारख्या कंपन्या भारतातील सेवा क्षेत्रातील संधी हेरून त्यात पैसा ओतत आहेत. भांडवल टाकतो तो मलिदा खातो, या न्यायाने अशा कंपन्या त्यातून प्रचंड कमाई करत आहेत. देशात पुरेसे भांडवल नसल्याने भारतीयांवर मात्र सेवा क्षेत्रातील चोथ्यावर समाधान मानण्याची वेळ आली आहे. सॉफ्टबॅंकेने अलीकडे जाहीर केलेला ताळेबंद या संदर्भाने भारतीयांची झोप उडविणारा आहे.

ओला, उबेरच्या टॅक्‍सीने तुम्ही प्रवास करत असाल किंवा फ्लिफकार्ट, ऍमेझॉनवरून घरबसल्या ऑनलाइन वस्तू खरेदी करत असाल तर तुम्ही जगाच्या नव्या अर्थकारणाचा भाग झाला आहात. भले तुम्ही शेअरबाजाराच्या वाट्याला गेला नसाल पण तुम्ही सरकारी एलआयसी कंपनीच्या किंवा इतर कोणत्याही खासगी कंपनीच्या विमा पॉलिसी घेतल्या असतील, तरीही तुम्ही जगाच्या या अर्थकारणात उडी घेतली आहे. जगाचे अर्थकारण असे काही वळण घेते आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला त्यात भाग घ्यावाच लागणार आहे. फ्लिफकार्ट, ऍमेझॉनसारख्या कंपन्यांनी तर थेट शेअर बाजारात उतरून भांडवलाची उभारणी केली आहे.

ओला, उबेर, ओयोच्या मागे सॉफ्टबॅंक सारख्या भांडवल पुरविणाऱ्या कंपन्या उभ्या आहेत. तर एलआयसीसारखी कंपनी तिच्याकडे येणाऱ्या कोट्यवधी रुपयांतील काही हिस्सा नियमितपणे शेअरबाजारात गुंतवित आहे. आपल्या खिशातून खर्च झालेल्या पैशातून हे नवे अर्थकारण आकार घेते आहे, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. जगातील कानाकोपऱ्यातून जमा होणारा हा पैसा कसा जमा होतो, त्यावर कसा नफा मिळविला जातो आणि त्यांना होणाऱ्या फायद्यातोट्याचा आणि आपला कसा थेट संबंध आहे, ते शांतपणे समजून घेतले तरच आपले भविष्यातील जगण्याचे धोरण ठरविणे आपल्याला शक्‍य होईल.

सॉफ्टबॅंक नावाच्या मुळातील जपानी असलेल्या जागतिक कंपनीची जी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली, त्यावरून या अर्थकारणाचा उलगडा करून घेण्यास मदत होईल. मुळात सॉफ्टबॅंक ही काही बॅंक नव्हे. ती आहे जपानमधील सॉफ्टवेअर पुरविणारी कंपनी. पण गेल्या काही वर्षांत तिने इतके पैसे कमावले की तो पैसा गुंतविण्यासाठी तिचे मालक मासायोशी यांनी 2016 मध्ये 100 अब्ज डॉलरचा व्हीजन फंड घोषित केला. जगामध्ये जे नवनवे तंत्रज्ञान येते आहे किंवा स्टार्टअप पुढे येत आहेत, त्यात गुंतवणूक करण्यासाठी तो गेली तीन वर्षे वापरला जातो आहे.

नव्या तंत्रज्ञानाला व्यवहारात उतरवून त्याची बिझनेस मॉडेल तयार केली जातात आणि त्या माध्यमातून जगभरातून पैसा कमावला जातो. फ्लिफकार्ट, ऍमेझॉन, ओला, उबेर, पेटीएम, ओयो, स्वीगी, झोमोटो ही त्याची आपल्याला परिचित असलेली उदाहरणे. ही गुंतवणूक त्या त्या देशाच्या कायद्यानुसारच चाललेली असते, त्यामुळे त्याविषयी कोणाला आक्षेप घेता येत नाही, पण नव्या तंत्रज्ञानात केवळ भांडवल वापरण्याचे धाडस करून जगात एवढा पैसा कमावला जाऊ शकतो, याची प्रचीती जगाला गेली काही वर्षे येते आहे. हे योग्य की अयोग्य, याविषयी वाद होऊ शकतो, पण ज्याच्याकडे भांडवल आहे, त्याला जगाची दारे कशी पटापट उघडतात, हे लक्षात येते.

पैशाकडे पैसा खेचला जातो, याचा अनुभव आपल्या शेजारी पाजारी वर्षानुवर्षे आपण घेतच आलो आहोत, पण हा अनुभव जेव्हा जगव्यापी होतो, तेव्हा काय होते, हे आपण सध्या अनुभवतो आहोत. तर अशा या सॉफ्टबॅंक ग्रुपने मार्चअखेरचा ताळेबंद नुकताच जाहीर केला. त्या ग्रुपच्या नफ्यात यावर्षी 80 टक्‍के वाढ झाली आहे. त्याने या वर्षात 22 अब्ज डॉलर इतका नफा कमावला आहे. महत्त्वाचे म्हणजे फ्लिफकार्ट आणि ओयो या नवकल्पनामध्ये कंपनीच्या व्हीजन फंडाने जी गुंतवणूक केली होती, तिचा या नफ्यात सिंहाचा वाटा आहे. भारताला इमर्जिंग मार्केट का म्हटले जाते, हे यावरून लक्षात येते. मासायोशी यांनी 100 अब्ज डॉलरमधील 10 अब्ज डॉलर (सुमारे 75 हजार कोटी रुपये) हे खास भारतात गुंतविण्यासाठी वेगळे काढले होते.

ओयो ही इंटरनेटच्या माध्यमातून हॉटेलचे आरक्षण करणारी भारतीय कंपनी आहे. रितेश अग्रवाल या पंचवीस वर्षे वयाच्या भारतीय तरुणाने ती सुरू केली. पण त्याच्याकडे भांडवल नव्हते. तिच्यात या फंडाने 1.4 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच काळात ओयोचा चीन आणि युरोपमध्ये विस्तार झाला, त्यामुळे व्हीजन फंड मालामाल झाला. दुसरी भारतीय कंपनी फ्लिफकार्टमध्येही या फंडाने गुंतवणूक केली होती. फ्लिफकार्टचा 77 टक्‍के हिस्सा अमेरिकन कंपनी वॉलमार्टने 16 अब्ज डॉलरला (सुमारे 1.15 लाख कोटी रुपये) विकत घेतला आणि या व्यवहारात या फंडाला सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला, याचा अर्थ दोन-तीन वर्षांतच फंडाची गुंतवणूक दुप्पट झाली!
सॉफ्टबॅंकेने 2015 मध्ये ओयो या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली तेव्हा ओयोचे बाजारमूल्य होते फक्‍त चार कोटी डॉलर म्हणजे सुमारे 2800 कोटी रुपये. ते पुढे सुमारे 35 हजार कोटी रुपये झाले. यात 45 टक्‍के वाटा सॉफ्टबॅंकेचा होता.

सॉफ्टबॅंकेने ओयोमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक केली तेव्हा ओयो 13 हजार हॉटेल खोल्यांचे व्यवस्थापन करत होते, जी संख्या पुढे सहा लाख खोल्या इतकी झाली! याच काळात ओयोने चीन आणि युरोपीय देशांत प्रवेश केला. युरोपातील लीजर हा ग्रुप विकत घेतला. गेल्या दोनतीन वर्षांत सॉफ्टबॅंकेने अशा एकूण 69 कंपन्यांत गुंतवणूक केली, त्यासाठी कंपनीने या फंडाद्वारे 60.1 अब्ज डॉलर भांडवल वापरले आणि त्या गुंतवणुकीचे मूल्य मार्च 2019 अखेर 72.3 अब्ज डॉलर एवढे आहे! हे आकडे चक्रावणारे आहेत, पण त्यांचा विचार आपल्याला करावाच लागेल, कारण आपण त्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला कोठे ना कोठे गाठणारच आहेत. उदा. तुम्ही महानगरांत प्रवास करताना ओला, उबेरचा वापर करणारच आहात आणि ओयो रूम स्वस्त पडतात म्हणून त्याचे बुकिंगही करणारच आहात.

पैशांची ही सायकल किती वेगाने फिरते, हे पाहण्यासारखे आहे. पहिल्या व्हीजन फंडने मालामाल केलेली सॉफ्टबॅंक आता या फंडांची नोंद भांडवली बाजारात करणार आहे आणि त्याच बरोबर 100 अब्ज डॉलरचा दुसरा व्हीजन फंड पुढील गुंतवणुकीला सज्ज झाला आहे. भारतासारख्या सेवा क्षेत्राचा वेगाने विकास होत असलेले देश व्हीजन फंडाच्या रडारवर आहेत. पेटीएम, ओला, पॉलिसी बझार, ग्रोफर्स या ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टबॅंक पैसा ओतते आहे. ग्रोफर्स या भारतीय स्टार्टअपमध्ये व्हीजन फंड 2.80 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 1,970 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक साखळी अशीच सुरू राहील, कारण त्या कंपनीने भारतातील ग्राहकांची संख्या ओळखली आहे.

कमीतकमी मानवी हस्तक्षेप असलेल्या या सेवा नागरिकांच्या दैनंदिन गरजा आहेत, त्यांची वारंवारता अधिक आहे. त्यामुळे त्याचा एक साचा तयार करण्याचे काम या कंपन्या तयार करतात आणि त्यातून पैसा त्यांच्या खात्यात जमा होत राहतो. या कंपन्यांची आर्थिक क्षमता यात सर्वात महत्त्वाची असली तरी तेवढा पैसा ओतण्याचे धाडस आणि पुढे ज्या सेवांना मागणी येईल, अशा सेवा हेरण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.

पण या सेवांतून जो प्रचंड पैसा देशाबाहेरील कंपन्याकडे जातो आहे, हे आपल्याला उघड्या डोळ्याने पाहावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर या कंपन्या जे तंत्रज्ञान आणत आहेत, त्यात रोजगार संधीऐवजी कमीतकमी मनुष्यबळ वापरून ती सेवा पोहोचविण्याकडे कल असणार आहे. त्यामुळे सॉफ्टबॅंकसारख्या कंपन्या भांडवल गुंतवणूक करून सेवा क्षेत्रातील रोजगार संधीचे केंद्रीकरण करणार आहेत, ज्यातून अशा काही सेवांमध्ये त्यांची मक्‍तेदारी प्रस्थापित होणार आहे.

कायम भांडवलाची आणि रोजगार संधींची टंचाई असलेला भारत या आव्हानाला कसे तोंड देणार, हा मोठाच प्रश्‍न आहे. अर्थात, भारतीयांनी आपले एका जागी पडलेले (उदा. सोने) भांडवल बॅंकिंगद्वारे फिरते ठेवले तर भविष्यातील भांडवल गुंतवणुकीच्या संधी भारतीय उद्योजकांनाही घेता येतील. नाहीतर मलिदा त्यांनी खायचा आणि चोथ्यासाठी भारतीयांनी मारामार करायची, हे ठरलेले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.