आपला चातुर्मास : खरा उपवास

-अरुण गोखले

चातुर्मास सुरू झाला म्हटले की, आपल्या घरात आणि मनात सर्वात प्रथम जे विचार सुरू होतात ते या चातुर्मासातील उपवासाचे. कारण आपल्या साप्ताहिक किंवा मासिक उपवासात आणखी या चातुर्मासातील श्रावणी सोमवार, शनिवार, व्रतांचे उपवास ह्यांची भर पडते. आपण उपासतापास करतोच. पण त्याचा नेमका अर्थ, कारण आणि खरे आचरण काय आहे? हे जाणून घ्यायला हवे.

नियमानुसार नाही झाले, तर मग आपला उपवास हा खरा उपवास न राहता तो उपहासाचा विषय बनतो. उपवासाचा संबंध प्रामुख्याने जसा आपल्या शारीरिक आरोग्याशी निगडीत आहे तसाच तो आपल्या मन:स्वास्थ्याशीही निगडीत आहे. चातुर्मासात आपल्या रूढी, परंपरेने उपवास का करायला सांगितला आहे, याचा नीट विचार केला तर असे लक्षात येते की, या कालावधीमधील वातावरण, ऋतुमान, मंदावणारी भूक, कमी होणारी पचनशक्‍ती यांचा आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे.

मानवी शरीर हे कार्यक्षम, उल्हासित राहण्यासाठी पोषक आणि संयमित आहाराचीच गरज असते. या ऋतुमानातील अधिक आहार हा अजीर्ण, मळमळ, उलट्या, अपचन यास कारणीभूत ठरत असतो. काही वेळा जसे डॉक्‍टर आपल्याला लंघनाचा किंवा विशेष डाएटचा निर्बंध घालतात. तसाच काहीसा प्रकार या उपवासात आहे. उपवास ह्याचा खरा अर्थ आहे उप+वास म्हणजे जवळ जाणे. ज्या देवतेसाठी आपण तो उपवास करीत आहोत. त्या दिवशी तरी निदान आपण त्या देवतेशी उपासनेने, चिंतन, मनन आणि नामस्मरणाने जवळीक साधायची असते. ह्या गोष्टी आपले मन:स्वास्थ सुधारायला, मनोबल वाढवायला मदत करतात.

उपवासाच्या दिवशी खाल्ले जाणारे पदार्थ, आपली प्रकृती ह्यांचा फार विचार करायला हवा. कारण आपले होते काय की उपवास म्हणजे लंघन किंवा मित आहार हे विसरून आपण उपवासाचे नाना पदार्थ पोटभर खातो.

परिणामी त्या साबुदाणा, बटाटा, रताळी, वरई या पदार्थांमुळे पित्त वाढणे, डोके दुखणे, अपचन, उलट्या या सारखे प्रकार वाढतात. मग आपले चित्त देवाकडे लागण्याऐवजी आपलेच डोके धरून बसायची वेळ येते. हे असे होऊ नये म्हणून आपल्या हातून संयमित, उपयुक्‍त असा आहार घेतला जावा. खऱ्या अर्थाने त्या देवतेचा उपवास घडावा हेच या उपवास करा या सांगण्यामागचा मूळ हेतू आहे, हे विसरून चालणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.