अभिवादन : गोवंश राष्ट्राचे अधिष्ठान : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

-विठ्ठल वळसेपाटील

महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून समाजप्रबोधनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीतेतून मांडले. ग्राम विकास, ग्राम स्वच्छता, शेतीविकास, गोधन याविषयी ग्रामगीतेतून विचार मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. खंजिरी भजनाला लोकप्रियता मिळवून दिली. देशभर हिंडून त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. 30 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या पंधराव्या अध्यायात गोवंश सुधारविषयक विचार मांडले आहेत. गायीचे महत्त्व पटवून देताना धार्मिक कारणापेक्षा गाई शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयुक्‍त आहे, असे विचार त्यांनी परखडपणे मांडले. दुधाच्या भेसळीविषयीचे प्रश्‍न आध्यायाच्या पहिल्या चरणात मांडले आहेत. आजच्या परिस्थितीत दुधाला बाजारभाव नाही. सततचा दुष्काळ आणि शेतकरी हमीभावाची वाट पाहत आहे. असे ग्रामीण व्यवस्थेचे चित्रण तुकडोजी महाराजांनी अगदी वैशिष्ट्येपूर्ण मांडले आहे. याविषयी ते म्हणतात की, हा देश गोपाळांचा होता. आज मात्र गायी कमी झाल्या आहेत. काही कसायाला विकताहेत. चाराही महाग झाला आहे. मनुष्याला रोजगार राहिला नाही मग गायी कशा पाळणार? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. गोसंवर्धनाविषियी विचार मांडताना त्यांनी गो महत्त्वही विशद केले आहे.

शेतीसाठी गोवंश बैल महत्त्वाचा आहे. आधुनिक यंत्र असतानाही बैलांद्वारे शेती उत्तम होते. शिवाय गायीच्या दुधात जो सत्वांश आहे. तो कोणत्याच पदार्थात नाही. पूर्वी गायी, बैल ज्या शेतकऱ्याच्या दिमतीला होते तेथे आजारपण नव्हते आणि गरिबीही नव्हती. गाव कशी स्वयंपूर्ण होती हे ग्राम गीतेतून लक्षात येते. आज नको ते साथीचे आजार पसरत आहेत. शिवाय प्रत्येक मनुष्याची रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होताना दिसत आहे. जनावरांच्या मलमूत्रापासून शेताला सुबकता येत होती. त्यामुळे धनधान्य मुबलक होते. आज पशुसंवर्धन करताना देशी गाय मात्र नाहिशी होत चालली आहे. शिवाय बैलाविना गायीला संकर कृत्रिम पद्धतीने (कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा) होत आहे. दुधाचा उपयोग चहा कॉफीसाठी होऊ लागला आहे. माणूस मांस भक्षण करू लागला आहे. दुभती जनावरे विकून आराम करू लागल्याने माणूस सुखाच्या दिवसाला मुकला अशी आज माणसाची अवस्था झाल्याचे तुकडोजी महाराज सांगतात.

गोमातेची सेवा ही शेतकरीच नव्हे तर श्रीकृष्ण, भगवान शिवशंकर, वशिष्ठ ऋषी, दत्तदिगंबर, दिलीप राजा व शिवछत्रपती यांनीही गोसेवा केली. अनेक संत महात्म्यांनी गायीची महती विशद केली आहे. त्यांनी गायीची अपार सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचा नावलौकिक मागे राहिला. ज्यांनी घरादाराचा त्याग केला, भिक्षा मागितली, भटकंती केली, स्वतः उपाशी राहिले तरीही गोसेवेचे विसरणे झाले नाही. महाराजांनी गोमातेतील देवत्वही विशद केले आहे.

गायीच्या दुधाचा वापर हा मनुष्याबरोबर प्राणीमात्रालाही होतो. गायीच्या दुधाची महती सांगताना महाराज म्हणतात, दुधाने शक्‍ती व बुद्धीत वाढ होते म्हणून दुधात सरस्वतीचा वास आहे. दुधाने शरीर निरोगी राहते म्हणून धन्वंतरीची दृष्टी आहे. ताक पोटासाठी उपयुक्‍त, तूप मस्तक शांत ठेवते म्हणून सूर्य चंद्र आहेत तर शेणाने खत म्हणून शेत उत्तम पिकते, धनप्राप्ती होते म्हणून लक्ष्मी आहे. बैल श्रम मूर्ती आहे. गोमूत्र विविध आजारांवर उपयुक्‍त आहे. महाराजांनी गायीबरोबर गोवंश सुधारणेवर लक्ष दिले आहे. विविध गुण असलेली गाय ही देशाचे अधिष्ठान आहे. तिचक महत्त्व विशद करताना उपयुक्‍तता मांडली आहे.

गावोगावी व्हावी गो-उपासना / गोसेवा, गोदुग्ध मंदिर स्थापना /
रुची लावावी थोर लहान/ गो दुग्धाची परोपरी //
सर्व करावे जे जे करणे / परी सुधारावे सात्विक खाणे /
त्या वाचोनि सद्‌बुद्धि येणे / कठीण वाटे //

ग्राम व्यवस्थेत गोशाळा, गो उपासना, गो दुग्धमंदिर म्हणजे दुग्ध संस्था होय. यातून गायी पाळण्याची गोडी वाढवावी तसेच समृद्ध सदृढ बालकासाठी दुधाची गोडी लावावी, असे महाराज सांगतात. पुढे ते म्हणतात, गो रक्षणासाठी शक्‍य ते करावे. सात्विक आहार घ्यावा. सात्विकतेतून चांगली शक्‍ती, सद्‌बुद्धी व उत्तम आरोग्य लाभेल. शक्‍ती नसेल तर संपत्तीही लाभणार नाही. पुढे महाराज उत्तम मल्ल, उत्तम व्यायाम, आहार, विहार, पौष्टिक खाद्य, दिनचर्या, आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात. गोसेवा ही देशसेवा व ईश्‍वरसेवा मानतात.

महाराज सांगतात की, प्रत्येक व्यक्‍ती जर याप्रमाणे वागला तर त्यास रोग होणार नाही. खेडे असो की शहर असो ते निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. आज अतिशय धकाधकीच्या जीवनात आपण जीवनमूल्य हरवत चाललो आहे. यावर ग्रामगीता हस उत्तम उपाय आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.