चंडीगढ – लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या समवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने पत्नी आणि स्वत:कडे 87 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.
सनीने 2017-18 मध्ये सुमारे 64 लाख रूपये उत्पन्न मिळाल्याचे नमूूद केले आहे. प्रतिज्ञापत्रात त्याने स्वत:चा उल्लेख चित्रपट क्षेत्रातील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून केला आहे. सध्या त्याच्या हाती 26 लाख रूपयांची तर पत्नीकडे 16 लाख रूपयांची रोकड आहे. तो 51 कोटी रूपयांचे देणे लागतो. घायल, बॉर्डर, गदर, दामिनी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका निभावणाऱ्या सनीला भाजपने पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्याची लढत प्रामुख्याने विद्यमान खासदार आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांच्याशी आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. त्या सर्व जागांसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात 19 मे यादिवशी मतदान होईल.