नवी दिल्ली – सरकार महागाईचा सामना करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करीत आहे. खाद्य तेलाचे दर कमी व्हावे याकरिता पाम तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यावरून 12.5 टक्के करण्यात आले आहे.
या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. यामुळे नजीकच्या भविष्यामध्ये तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. या निर्णयाची अंमलबजावणी मार्च 2022 पर्यंत चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर 2022 पर्यंत आयातदारांना परवान्याशिवाय पाम तेलाची आयात करता येणार आहे असा निर्णय कालच सरकारने घेतला होता.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे तेल उत्पादक संघटनेचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी स्वागत केले आहे. हा विषय सकाळी लोकसभेतही उपस्थित झाला होता. या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, खाद्य तेलाचे दर कमी करण्यासाठी सरकार अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत आहे. या अगोदर ऑक्टोबर महिन्यामध्ये आयात शुल्क कमी करण्यात आले होते. आता पुन्हा आणखी आयात शुल्क कमी करण्यात आले आहे.
गेल्याच आठवड्यात तेल उत्पादकाच्या संघटनेने गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात खाद्य तेलाचे दर कमी झाले आहेत असा दावा केला होता. सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे तेलाचे दर आणखी कमी होण्यास मदत मिळणार आहे.