कोल्हापूर – आज भल्या पहाटे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडीने दुसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वारवाली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्याविरोधात वारंवार आक्रमक होताना दिसून येत होते. मुश्रीफ यांच्यावर पडलेल्या या धाडीनंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुश्रीफ यांच्या कागल येतील घराबाहेर त्यांचे समर्थक जमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुश्रीफ समर्थकांनी ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हळूहळू मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली असल्याचे देखील समोर येत आहे. मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे अधिकारी ठाण मांडून बसलेले असताना राजकीय वर्तुळातून या कारवाईविरोधात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना काही महिला कार्यकर्त्यांनी ‘घरातील कोणच्याही केसाला धक्का लावला तर सोडणार नाही असा इशारा दिला. कार्यकर्त्यांनी घरात घुसू नये यासाठी घराबाहेर स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलाचे जवान तैनाद करण्यात आले आहेत.कार्यकर्त्यांनी ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याने काही काळ याठिकाणी तणावाचे वातवरण निर्माण झाले.
मुश्रीफ यांच्या घरावर 11 जानेवारी रोजी पडली पहिली धाड
11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.