मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या जोरदार भाषणांना मुळे ठाकरे गटाला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना सतत व्यक्त केली जाता आहे.
दरम्यान, आपल्या व्यक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सुषमा अंधारेंनी आता आपला मोर्चा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच बीडमध्ये परळीत उद्धव ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुषमा अंधारे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल चढवला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “परळी सारख्या ठिकाणी आपलं संपर्क कार्यालय होत आहे. इथं राष्ट्रवादीचे देखील कार्यालय आहे, भाजपचं देखील संपर्क कार्यालय आहे. मात्र त्या भाजपच्या कार्यालयात कोणीच नसतं.” असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी पुढे बोलताना शायरी म्हणत टोलेबाजी केली, “इलाका तुम्हारा और धमाका हमारा होंगा…’ असं म्हणतं त्यांनी पंकजा मुंडे यांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव सतत चर्चेत असल्याचं दिसून येत. आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.