नवी दिल्ली – शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने त्या चिन्हावर दावा केला आहे. त्यावरून निवडणूक आयोगाने शुक्रवारी ठाकरे गटाकडून उत्तर मागवले. त्यासाठी ठाकरे गटाला उद्या (शनिवार) दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे धनुष्यबाणासाठीची लढाई निर्णायक टप्प्यावर आल्याचे संकेत मिळत आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पुढील महिन्याच्या प्रारंभी (3 नोव्हेंबर) होणार आहे. त्या पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी झाली. त्या पोटनिवडणुकीचे कारण देऊन शिंदे गटाने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. पोटनिवडणूक जवळ आल्याने धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देण्यात यावे, अशा मागणीचे लेखी निवेदन शिंदे गटाने सादर केले. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला तातडीने बाजू मांडण्यास आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. ठाकरे गटाने निर्धारित मुदतीत उत्तर न दिल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने दिलेल्या आदेशानंतर ठाकरे गट निर्धारित मुदतीत प्रतिसाद देईल, अशी ग्वाही त्या गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. त्याआधी देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन इतर प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर केली. ते प्रकरण खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा शिंदे गटाने केल्याशी संबंधित आहे.
आता शिंदे गटाने नवा दावा करून धनुष्यबाण चिन्हावर हक्क सांगितला आहे. त्यामागे ठाकरे गटाला पुढील महिन्यातील पोटनिवडणुकीसाठी ते चिन्ह मिळू नये अशी खेळी असल्याचे मानले जाते. शिंदे गटाकडून ती पोटनिवडणूक लढवली जाणार नाही. त्या गटाचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असेल. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग ऍक्शन मोडमध्ये आल्याने धनुष्यबाण कुठल्या गटाला मिळणार की ते चिन्ह गोठवले जाणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.