लंडन – ब्रिटनमध्ये गेल्या काही काळात हिंदू समुदायाच्या विरोधात द्वेषाचे वातावरण तयार केले जात असून तेथे राहणाऱ्या या समुदायाला लक्ष्य करण्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हिंदूफोबियाच्या विरोधात लढण्याचा निर्धार या देशातील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने व्यक्त केला आहे.
अलिकडेच भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर लेसिस्टर आणि बर्मिंघम येथे धार्मिक हिंसाचार आणि द्वेषातून निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात धर्माच्या आधारावर लक्ष्य करण्याचे प्रकार घडले होते. या प्रकारच्या घटनांविरूध्द लढण्याची ग्वाही आता लेबर पक्षाने दिली आहे.
बुधवारी लंडन येथे युरोपातील सगळ्यांत मोठ्या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे आपले विचार मांडताना या पक्षाचे नेते किएर स्टार्मर म्हणाले की, दुही निर्माण करणारे हे राजकारण आपल्याला संपवावे लागेल. तसेच दोन्ही समुदायांत तेढ निर्माण करण्यासाठी व वैमनस्य वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या शक्तींचाही आपल्याला खातमा करावा लागेल.
गेल्या काही दिवसांत विशेषत: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर हिंदूंबद्दल विनाकारण भयाचे वातावरण निर्माण केले गेले. तसेच समाज माध्यमातून त्याला खतपाणी घातले गेले आणि अराजकासारखी स्थिती निर्माण केली गेली असा आरोप ब्रिटनमधील काही संघटनांनी केला आहे. मात्र आपल्या समाजात असल्या हिंदूफोबियाला कोणतेही स्थान नसून त्या विरोधात आपल्याला एकत्रितपणे लढावे लागेल असे स्टार्मर यांनी म्हटले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शेकडो भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.
स्टार्मर म्हणाले की धर्माच्या नावावर अनेक लोकांना लक्ष्य केले जाते आहे. अशा घटनांमध्ये आता वाढ झाल्याची आपल्याला कल्पना आहे. धर्माच्या आधारावर होत असलेल्या अशा फाळणीच्या घटना पाहुन आपल्याला अत्यंत वेदना होत आहेत. मात्र त्याचा आपण कट्टर विचारसरणीच्या शक्तींना लाभ घेऊ देता कामा नये. आपल्याला परस्परांशी लढवणाऱ्या बाबींपेक्षा जोडणाऱ्या बाबी अधिक आहेत. आपला धर्म आणि प्रार्थनास्थळांचा सन्मान केला गेला पाहिजे. लेबर पक्षाचे सरकार आल्यावर सगळ्यांना एकत्र आणले जाईल आणि दुहीचे राजकारणही संपुष्टात आणले जाईल.