– ऋषिकेश जंगम
अभिनेता आणि मॉडेल ‘मिलिंद सोमण’ने वयाच्या 57 व्या वर्षी देखील स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे. त्याची तंदुरुस्ती आणि उत्साह-उर्जा या वयातही तरूणांना लाजवेल अशी आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहू इच्छिणाऱ्यांसाठी मिलिंद सोमण हा नेहमीच प्रेरणास्थान राहिला आहे. तो सोशल मिडियावरही सक्रीय असतो आणि सायकलिंग, धावणे, पुशअप्स, जिममधील फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मिडियावर शेअर करत असतो.
मिलिंद सोमणला तुम्ही अनेकदा पळताना पाहिले असेल. तो रोज जिममध्ये जात नाही किंवा रोज धावण्याचा व्यायाम करत नाही. वयाच्या 38 व्या वर्षीच त्याने जिमला जाणे बंद केले आहे. जिम फक्त शरीरसौष्ठवासाठी असते, तंदुरुस्तीसाठी नाही असे त्याचे मत आहे. त्याचे असेही म्हणणे आहे की, तो आज जितका तंदुरुस्त आहे तितका तो 20 व्या वर्षीदेखील नव्हता.
वयाच्या तुलनेत अगदी व्यवस्थित मेन्टेन केलेला फिटनेस हा युवकांनाही लाजवेल असाच आहे. सगळे जण त्याला या फिटनेसचे रहस्य विचारत असतात. आणि याच फिटनेसचे रहस्य मिलिंदने आता उलगडले आहे. मिलिंदला गोड पदार्थ खायला खूप आवडतात असं देखील त्याने यावेळी सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे.
यावेळी तो म्हणाला की, ‘मी आठवड्यातील तीन ते चार दिवस सकाळी धावण्याचा व्यायाम करतो आणि सतत स्वतःला सक्रीय ठेवतो. रोज नियमितपणे किमान वीस मिनिटे व्यायाम करतो. जेणेकरून शरीराच्या नैसर्गिक हालचालींवर वयामुळे मर्यादा येऊ नयेत. त्याचबरोबर नियमित सूर्यनमस्कार घालतो. शरीर तंदुरुस्त हवे असेल तर सूर्यनमस्काराला पर्याय नाही, असे तो सांगतो.
तसेच, मी दिवसाची सुरवात जवळपास अर्धा लिटर पाणी पिऊन करतो. त्यानंतर धावण्याचा व्यायाम, सूर्यनमस्कार आणि नऊ वाजण्याच्या सुमारास नाश्त्याला शेंगदाणे, पपई, टरबूज, कलिंगड अशी हंगामी फळे खातो. दुपारी दोन वाजताच्या जेवणामध्ये भात किंवा दालखिचडी, भाज्यांचा समावेश असतो. भातावर तो दोन चमचे तूप घेतो. त्याखेरीज भाजीबरोबर ते चार ते पाच चपात्या खातो. महिन्यातून एकदा चिकन, मटण, अंडी असा आहार असतो.
मिलिंद सांगतो की, मी एका एक पूर्ण पपई किंवा खरबूज एकटाच खाऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी मी फळे खातो. मिलिंद सांगतो की तो अर्ध्या तासात 3-4 किलो फळे खाऊ शकतो. यावेळी मिलिंदला चीट मीलबद्दल विचारले असता त्याने उत्तर दिले, “मी कधीच चीट करत नाही. मला आवडते ते सगळं मी खातो. मला जिलेबी आणि काजू कतली आवडते. माझी बायको मला जेवायला वाढते. मिलिंदने सांगितले की, मी आहारात सर्वकाही खातो.
पुढे तो म्हणतो ज्या पदार्थांचा तुम्हाला फायदा होतो त्याचे प्रमाण वाढवा. तर जे पदार्थ तुम्हाला नुकसान देतात ते खाण्यातून वगळा किंवा त्याचे प्रमाण कमी करा. त्यामुळे मी चिप्स, बर्गर, पिझ्झा सगळं काही खातो. हे सगळं मी कमी प्रमाणात का होईना पण मी खातो. फळे आणि भाज्यांचा आहारात रोजच्या आहारात समावेश करून घ्या.
संध्याकाळी पाच वाजता तो ब्लॅक टी पितो. तो गुळाचा बनवलेला असतो. रात्री हलक्या जेवणाला त्याची पसंती असते. एक प्लेट भाजी किंवा जास्त भूक असेल तर दालखिचडी एवढेच जेवण घेतो. रात्री तो कधीही मांसाहार करत नाही. गोड पदार्थ फक्त गुळाचेच खातो. असं त्याने सांगितलं. दरम्यान, मिलिंद सोमणचा फिटनेस हा आजच्या युवकांनाही लाजवेल असाच आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं विशेष कौतुक..!
फिट इंडिया अंतगर्त एका कार्यक्रमावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मिलिंद सोमणला त्याच्या फिटनेस बद्दल आणि त्याचे खरे वय विचारले असता तो म्हणाला होता की, ‘मी माझ्या आईला माझा आदर्श मानतो ती 81 वर्षांशी असून ती रोज ज्या गोष्टी करू करते त्या सर्व गोष्टी मी जेव्हा तिच्या वयाचा होईल तेव्हा त्या मला देखील करता आल्या पाहिजे, माझी आई आज देखील नियमित थोडा फार का होईना व्यायाम करते. तिने अनेक पर्वत सर केले आहेत. आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळत आली आहे. तो पुढे म्हणाला, मी एकदा दिल्ली ते मुंबई देखील धावत आलो होतो. त्यावेळी देखील सर्वांनी माझे कौतुक केलं होते.