बंगळुरू – केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मुलगा चंडी ओमन याने फेसबुक पोस्टद्वारे केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाची माहिती दिली. ओमन चंडी यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून बरी नसल्याने ते उपचारासाठी बंगळुरूमध्ये थांबले होते. चंडी हे दोनदा केरळचे मुख्यमंत्री होते. मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
यासोबतच केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ओमन चंडी यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. ओमन चंडी यांना बंगळुरूतील चिन्मय मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करून चंडी यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या जनतेप्रती अतूट बांधिलकीच्या आणि दूरदर्शी नेतृत्वाने केरळच्या प्रगतीला आणि राजकीय नकाशाला आकार दिला. त्यांनी त्यांच्या कामाची कायमची छाप सोडली. त्यांच्या समर्पण आणि लोकांच्या सेवेसाठी ते स्मरणात राहतील असे खर्गे यांनी म्हटले आहे.