मुंबई – टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे भारतातील प्रत्येक सामान्य माणूस चिंतेत असताना, बॉलीवूड कलाकार देखील यापासून सुटलेले नाहीत. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम त्यांच्या स्वयंपाकघरावरही झाला असल्याचं अभिनेत्यानं यावेळी सांगितलं आहे.
वास्तविक सुनील शेट्टी अनेक रेस्टॉरंट्सचे मालक आहेत. यासोबतच सुनील त्याच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर फळे आणि भाजीपाल्याचीही लागवड करतो. अशा स्थितीतही टोमॅटोच्या वाढत्या भावाचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. नुकतेच त्यांनी यासंदर्भातील आपले मत व्यक्त केलं.
“टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खातो.’ असं अभिनेता म्हणाला होता. मात्र, आता त्याच्या या विधानावरून महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांनी सुनील शेट्टीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
“अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही..’, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुनिल शेट्टीवर टीका केली आहे. टोमॅटो खाल्ले नाहीतर सुनील शेट्टी मरणार नाही असेही तुपकर म्हणाले. तर दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी देखील अभिनेत्यावर जहरी टीका केली आहे.
यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, “टोमॅटोचे भाव वाढले म्हणून इंटरनॅशनल विषय करणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही. तुमच्या मालकीच्या हॉटेलमधील जेवणही अनेकांना परवडत नाही, मग आम्ही काही म्हणतो का? सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते..’ रविकांत तुपकर म्हणाले.
तर या विषयी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्याला फायदा होतो तर चुकीचं काय? असा प्रश्न सदाभाऊंनी विचारला आहे. दोन पैसे शेतकऱ्याला मिळाले तर सुनील शेट्टीच्या पोटात दुखतं का? असा खोचक सवालही सदाभाऊंनी केला आहे.
टोमॅटो भाव वाढीवर नेमकं सुनील शेट्टी काय म्हणाला होता?
मुलाखतीत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, “माझी पत्नी माना शेट्टी ताजे फळे किंवा भाज्या खरेदी करते. आमचा ताज्या पिकांवर विश्वास आहे. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार असल्यामुळे या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण ते खरे नाही, अशा समस्यांना आम्हाला देखील तोंड द्यावे लागते.
यावेळी सुनील शेट्टीने एका सोशल मीडिया अॅपवरून फळे आणि भाज्या खरेदी केल्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी एका अॅपवरून भाज्या किंवा फळे ऑर्डर करतो, परंतु ते स्वस्त आहे म्हणून नाही, तर ते ताजे पदार्थ विकतात म्हणून… मी देखील एक रेस्टॉरंट मालक आहे आणि मी नेहमीच चांगल्यासाठी सौदेबाजी केली आहे. पण टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे इतरांप्रमाणे मलाही चव आणि दर्जाबाबत तडजोड करावी लागत आहे.’