पालघरला भूकंपाचे धक्‍के; एकाचा मृत्यू

पालघर – एकीकडे पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यातच डहाणू, तलासरी तालुक्‍याबरोबर पालघरमधील काही भाग आणि गुजरातच्या उंबरगावपर्यंतचा भाग भूकंपाच्या धक्‍क्‍यांनी हादरला. मध्यरात्री एकच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले. जिल्ह्यात 3.8 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आयएमडीने दिली.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे सत्र सुरूच असून बुधवारी रात्री पुन्हा परिसरातील गावे भूकंपाच्या तीव्र धक्‍क्‍यांनी हादरली आहेत. त्यात नागझरी बोंडपाडा येथील रिश्‍या दामा मेघवाले ( 55) यांच्या अंगावर घर कोसळून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ंत्या घरात रिश्‍या व त्यांची पत्नी झोपले असताना रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याने घर कोसळले. त्यात दबल्याने रिश्‍या यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात कालपासून (24 जुलै) पावसाने दमदार हजेरी लावली असून, आजही पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नदी-नालेही भरुन वाहायला सुरुवात झाली आहे.
यामुळे आधीच मुसळधार पाऊस आणि त्यात भूकंपाचे धक्के यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पालघरच्या नागरिकांच्या अडचणीत आणखी भर म्हणून पावसामुळे काही ठिकाणी वीजही गायब आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)