मुंबई- कोणाचा प्रवेश होत आहे हे माहित नाही. परंतु यापुढेही मी वरळीचा आमदार असेन, असे सूचक विधान वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश केला आहेत. त्यासंदर्भात विचारले असता सुनील शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. परंतु सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तानंतर शिवसेनेत विशेषत: सुनील शिंदे यांच्यासह समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अहिर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर मातोश्रीबाहेर जमले होते. यावेळी वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदेही पोहोचले. यावेळी शिंदेंना अहिर यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कोणाचा प्रवेश होतोय हे मला माहित नाही. सामान्य शिवसैनिकाप्रमाणे इथे आलो आहे. परंतु पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो पक्षाच्या हिताचा असेल. तसेच सचिन अहिर यांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार, या प्रश्नावर सुनील शिंदे यांनी “आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असे सूचक विधान केले.
दरम्यान, 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांचा पराभव केला होता. परंतु आता अहिर यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेसाठी आपल्या उमेदवारीला धोका निर्माण होण्याची भीती सुनील शिंदे यांच्या मनात असल्याचे मानले जात आहे.