अलाहाबाद – एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मात्र आरोप करणारी मुलगीच माघार घेत असल्याचे लक्षात आल्यावर न्यायालय चांगलेच भडकले.
न्यायाधीशांचा पार इतका चढला की बलात्कार पीडित म्हणून संबंधित मुलीला उत्तर प्रदेश सरकारने जी मदत केली आहे ती रक्कम उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने ताबडतोब परत घ्यावी असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. हा प्रकार म्हणजे न्यायालयाची थट्टाच असून जनतेच्या पैशांचा असा दुरूपयोग मान्य केला जाणार नाही असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.
न्यायमूर्ती व्रजराज सिंह यांच्या न्यायालयात बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामीनावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी आरोप करणारी युवती तिने अगोदर केलेल्या आपल्या आरोपांपासून माघार घेत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसे जर असेल तर आरोपीला जामीन देणेच योग्य राहील असे नमूद करत न्यायाधीशांनी आरोपीच्या सुटकेचे निर्देश दिले.
बलात्काराचा गंभीर आरोप करून नंतर माघार घेणे हा प्रकार म्हणजे कायद्याचा दुरूपयोग करणे आहे अशी टिप्पणीही न्यायालयाने व्यक्त केली. उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील हे प्रकरण आहे. यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा अरोप एका व्यक्तीवर पीडितेच्या भावाने केला होता.