मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यासोबतच पुण्यातील कसब्यासह चिंचवड पोट विधानसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा केला. फडणवीसांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंदच आहे असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला. तसेच पूर्वीचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यांच्या खूप फरक आहेत असेही राऊत यावेळी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत यांनी फडणवीसांनी केलेल्या विधानावर भाष्य केले.
फडणवीसांना स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याचा छंद का जडला आहे हे मला समजत नाही. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना फडणवीस विरोधी पक्षनेते होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून जात होते अशा वेळेला उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेत्याशी बोलले असतील.. ठीक आहे. ते इतक्या दिवसांनी हे सांगून कोणती सनसनाटी निर्माण करू इच्छितात हे पाहावं लागेल असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती ना, तुम्ही आता उपमुख्यमंत्री आहात किती काळ राहाल ही दिल्ली की मर्जी असा चिमटाही यावेळी संजय राऊत यांनी काढला.
फडणवीसांचा गौप्यस्फोट नेमका काय
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफेरबाबत खुलासा केला.,“एकनाथ शिंदे हे जेव्हा सुरतला निघाले होते त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी संपर्क केला होता. त्यानंतरही केला होता. मला तर त्यांनी इथपर्यंत सांगितलं की जे काही झालं ते झालं.. आता हे सगळं थांबवा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा.मी त्यावेळी त्यांना उत्तर दिलं की आता ती वेळ निघून गेली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्यांना आम्ही तोंडघशी पाडणार नाही. हे माझ्या आणि माझ्या पक्षाच्या धोरणात बसत नाही” असं फडणवीस म्हणाले.