वाघोली -येथे एक अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला लोणीकंद पोलिसांनी तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यामुळे त्या व्यक्तीस जीवदान मिळाले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 45 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचला आहे, यामुळे नातेवाइकांनी लोणीकंद पोलिसांचे आभार मानले.
रवींद्र दत्तात्रय कामठे (वय 45 रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मंगळवारी (दि. 11) रात्री नऊच्या सुमारास पेरणे गावातील काही नागरिकांनी लोणीकंद पोलीस ठण्यात येऊन एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिली.
यावेळी पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना याबाबत माहिती दिली. मानकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.
सकाटे यांनी उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार ऋषिकेश व्यवहारे, होमगार्ड वाघमारे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत त्याठिकाणी उभा असलेल्या टेम्पोमधून त्या व्यक्तीला वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, त्याच्या खिशात मोबाइल असल्यामुळे नातेवाइकांना संपर्क साधून कळविण्यात आले.