पावसामुळे पेठ परिसरातील शेतकरी अडचणीत

बटाटा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम ढासळले

पेठ- आंबेगाव तालुक्‍यातील पेठ परिसरात गेल्या महिनाभरापासून पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तसेच शेततळे आणि पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. पेठ परिसरातील प्रसिद्ध बटाटा पिकही धोक्‍यात आले आहे. परिसरातील अनेक विहिरीचे बांधकाम कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

आंबेगाव तालुक्‍यात जवळजवळ एक महिनाभर मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यामध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान समोर येऊ लागले आहे. शनिवारी पेठ आणि परिसरात अक्षरशः ढगफुटीने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतामध्ये सर्वत्र पाणी साचले होते.

पेठ येथील भोसले-गुंजाळवस्ती येथील शेतकरी गिरजु खंडु भोसले (वय 63) या शेतकऱ्यांची जुने दगडी पक्‍के बांधकाम असलेली विहीर शनिवारी (दि. 10) मध्यरात्री ढासळली आहे. विहीर ढासळण्याच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले. ढासळलेल्या विहिरीजवळच तीन घरे असल्यामुळे तीनही घरांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती नाजूक असल्यामुळे आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी भोसले यांनी केली आहे. तसेच विहिरीजवळील घरांना धोका निर्माण झाला आहे. तलाठी आणि कोतवाल यांनी विहिरीचा पंचनामा केला आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. भोसले यांनी लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

  • पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित नुकसानीचे पंचनामे केले आहेत. तसेच संबंधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
    तलाठी हेमंत भागवत, कोतवाल संदीप तोत्रे

Leave A Reply

Your email address will not be published.