छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत बापाने पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याची घटना चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत घडली आहे. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा स्थानिकांच्या मदतीमुळे जीव वाचला. शुक्रवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सात वर्षीय श्रेयस राजू भोसले याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर नऊ वर्षीय शिवम राजू भोसले याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. राजू प्रकाश भोसले (वय 33) असे नराधम बापाचे नाव आहे. राजू भोसलेला दारूचे व्यसन असल्याने दोन महिन्यांपूर्वी राजूची पत्नी माहेरी निघून गेली होती. मात्र तिने मुलांना राजूकडे सोडले होते. त्यामुळे राजू मुलांचा सांभाळ करत होता.
चिकलठाणा भागात वेल्डींगची कामे करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आई, वडील व दोन मुलांसह तो राहतो. मात्र शुक्रवारी तो दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर त्याने 200 मीटरवर असलेल्या एका विहिरीत मुलांना फेकून दिले आणि घरी निघून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, अनिरुद्ध दहिहंडे या तरुणाने विहिरीत पडलेल्या मुलांचं आवाज ऐकला होता. तेव्हा त्याने विहिरीकडे धाव घेत 9 वर्षीय शिवमला वाचवले. पण, श्रेयसचा त्याला शोध घेता आला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर शोध कार्य सुरू झाले. तेव्हा पाण्यात बुडालेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आले, पण त्याचा मृत्यू झाला होता.