छत्रपती संभाजीनगर – अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. संयुक्त कारवाईत दोन्ही पथकांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यावर छापा टाकून कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले.
या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी रसायनांच्या आडून ड्रग्ज तयार केली जात असल्याचे तपासात उघड झाले.
सध्या हे ड्रग्ज कुठे आणि कुणाला पुरवली जात होती, याचा तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवणारा कारखाना आढळल्यानंतर उच्च सुरक्षा यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याची गुप्त माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची लिंक सापडली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही कारवाई केली. या कारखान्यातून 150 कोटी रुपयांच्या तयार ड्रग्जसह कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे.