पुणे – करोनाच्या साथीला अटकाव घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर पुण्यातही पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, महापालिकेकडून शहरात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड फवारणी करत असून या फवारणीमुळे संचारबंदीचा बोजवारा उडाला आहे. या कामासाठी फक्त संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येणे अपेक्षित असताना, महापालिकेचे नगरसेवकच कार्यकर्ते घेऊन हे काम करत आहेत. त्यामुळे संचारबंदीत अशा प्रकारे नगरसेवक असंवेदनशीलता दाखवीत असल्याने नागरिकही नाराजी व्यक्त करत आहेत.
शहरात करोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर पालिकेकडून केवळ रुग्ण असलेल्या परिसरातच औषध फवारणी केली जात होती. मात्र, पालिकेच्या या फवारणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच नगरसेवक या औषध फवारणीसाठी पालिकेकडे आग्रह धरत असल्याने 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे प्रत्येकी 1 जेटिंग मशीन तसेच 5 देवदूत गाड्या दिल्या आहेत. या गाड्या आता प्रत्येक प्रभागात जात असल्याने आपल्या पुढाकाराने ही फवारणी होत असल्याचे दाखविण्यासाठी चक्क नगरसेवकच हा फवारणी पाप हाती घेत आहेत.
तसेच, जागा दिसेल तिथे कशाही पद्धतीने फवारणी केली जात आहे. तर काही नगरसेवकांनी चक्क प्रभागातील झाडे तसेच मंदिराचे कळस आणि स्वतःच्या कार्यालयावर फवारणी करून घेत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी या करोनाचे विषाणू असल्यास ते नष्ट करण्यासाठी असलेली ही फवारणी घराच्या भीती धुण्यासाठी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आयुक्तांचे आदेश वाऱ्यावर
शहरात ही फवारणी सुरू करताना महापालिका आयुक्तांनी करोनाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात ते सुद्धा गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीच ही फवारणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवीत नगरसेवक सांगतील त्या भागातच ही फवारणी होत आहे. तर 3 प्रभागासाठी 1 मशीन असल्याने या मशीन काही ठराविक प्रभागातच जात असल्याने नगरसेवक आणि अधिकारी यांच्यामध्ये वाद सुरू आहेत.