अहमदाबाद – गेले 20 दिवस देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. करोनाशी लढताना अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंशिवाय सारा देश बंद आहे. मात्र आपल्या हव्या त्या गोष्टी मिळवण्याचा माणंसाचा अट्टाहास काही थांबत नाही. त्यामुळे पान मसाला शौकीनांची तल्लफ भागवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा खळबळजनक प्रकार गुजरातमध्ये उघड झाला आहे.
हा व्हिडिओ प्रथम टिक टॉकवर रिलीज झाला. त्याची पोलिसांनी तातडीने दखल घेतली. ग्राहकांना घरपोच पानमासाला पुरवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये दारू आणि सिगारेटचाही काळबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राजकोट पोलिसांनी या प्रकरणी हिरेन पटेल आणि त्याचा मित्र रवी यांना अटक केली आहे.
या व्हिडिओत, एका ड्रोनद्वारे घराच्या गच्चीवर पान मसाला आणि तंबाखूची पाकिटे टाकतानाचे छायांकन आहे. तर गच्चीत उभ्या असलेल्या व्यक्तीने हे पार्सल स्वीकारले आहे. हा ड्रोन रवी याचा असून त्याचा मित्र हिरेन पान मसाल्याच्या डिलिव्हरीसाठी तो वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर साथीचा कयदा आणि भादंवी 188 नुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे राजकोट पोलिसांनी सांगितले.
दरम्यान लॉकडाऊनच्या अंमल बजावणीसाठी गुजरात पोलिसांनही ड्रोनचा वापर सुरू केला आहे. रस्त्यावरच नव्हे तर सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न करता खासगी जागेत एकत्र येणाऱ्यांवरही त्यामुळे कारवाई करणे शक्य होत आहे, असे त्यांनी सांगितले.