अरविंद चौधरी ः राजगुरूनगरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
राजगुरूनगर – एसटी बस चालवताना चालक-वाहक यांच्यावर प्रवाशांच्या जबाबदारी असल्याने काळजी घेतली पाहिजे, प्रवास करताना अपघात होऊ नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचा अवलंब करावा, असे आवाहन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी केले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि राजगुरूनगर एसटी बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 11 ते 17 जानेवारी या दरम्यान राबविण्यात येत असून, त्याचा आरंभ खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या हस्ते राजगुरूनगर आगारात करण्यात आला, यावेळी झालेल्या कार्यक्रमात चौधरी बोलत होते.
यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, राजगुरूनगर आगार प्रमुख आर. जी. हांडे, वाहतूक पोलीस हवालदार सर्जेराव बागल, डी. डी. घनवट, डी. टी. मोसे, एस. एम. पठारे, व्ही. आर. कोंढावळे, राजगुरूनगर आगार वाहतूक निरीक्षक टी. एन. पवळे, दत्तात्रय गभाले, भारत वाबळे, माऊली कारंडे, किसन रणपिसे, स्नेहा कातोरे, सोमनाथ काळे, युवराज गेंगजे यांसह मोठ्या संख्येने एसटी चालक-वाहक आणि कामगार उपस्थित होते.